‘सीएनजी’ गॅसच्या दरात झालेल्या वाढीचा फटका वाहनचालकांबरोबरच ‘बेस्ट’बस आणि टॅक्सी व रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही बसणार आहे. ही दरवाढ केल्यामुळे ‘बेस्ट’च्या तिकिटात तसेच टॅक्सी आणि रिक्षाच्या भाडय़ातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
टॅक्सी-रिक्षा संघटनेचे नेते शरद राव यांनी सांगितले की, सोमवारपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यामुळे या दरवाढीच्या विरोधात प्रवाशांना त्रास होईल असे कोणतेही पाऊल आम्ही सध्या तरी उचलणार नाही. मात्र गणेशोत्सव झाल्यानंतर दरवाढीला विरोध आणि टॅक्सी-रिक्षांच्या भाडय़ात वाढ मिळावी म्हणून प्रखर आंदोलन केले जाईल. डॉलरच्या नावाने ‘सीएनजी’च्या दरात केलेल्या भाववाढीला शासनच जबाबदार आहे.
‘बेस्ट’ समितीचे अध्यक्ष नाना आंबोले म्हणाले की, या दरवाढीमुळे ‘बेस्ट’च्या तिकिटात तातडीने कोणतीही दरवाढ केली जाणार नाही. मात्र ‘सीएनजी’च्या दरात यापुढे आणखी दरवाढ झाली तर ‘बेस्ट’ला तिकीट दरात वाढ करण्यावाचून अन्य कोणताही पर्याय असणार नाही. त्यामुळे तिकीट दरवाढीचा विचार करावा लागेल.
मुंबई टॅक्सीमेन युनियनचे अध्यक्ष क्वाड्रोज यांनी सांगितले की, या प्रकरणी आम्ही तातडीने परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांची भेट घेऊन टॅक्सीचे किमान भाडे २५ रुपये करावे, अशी मागणी त्यांच्याकडे करणार आहोत. तर मोरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, टॅक्सी-रिक्षाची भाडेवाढ आणि त्याबाबतचा फॉम्र्युला याबद्दलचे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. त्यामुळे भाडेवाढीबाबत आताच काही बोलणे योग्य ठरणार नाही.
‘एसटी’वर परिणाम नाही
‘सीएनजी’ दरवाढीचा फटका राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस गाडय़ांना बसणार नाही. एसटीच्या सुमारे १८,५०० बसगाडय़ांपैकी फक्त ६२ बसगाडय़ा ‘सीएनजी’वर चालविल्या जातात, असे ‘एसटी’चे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सांगितले.मात्र डिझेल दरवाढ झाल्यास भाडेवाढीचा विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले.
‘बेस्ट’वर १८ कोटींचा बोजा
‘बेस्ट’च्या तीन हजार बसगाडय़ा या ‘सीएनजी’वर धावतात. या गाडय़ांसाठी वर्षांला ६३० लाख किलो इतका ‘सीएनजी’ गॅस लागतो. ‘सीएनजी’झालेल्या दरवाढीमुळे ‘बेस्ट’वर सुमारे १८ कोटी रुपयांचा वार्षिक बोजा पडणार आहे.