News Flash

सहकारी संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबपर्यंत स्थगित

राज्यातली सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या माध्यमातून होतात.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर येऊ घातलेल्या राज्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर अखेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. स्थानिक सहकारी संस्थामधील सत्तासंघर्षांचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटू नयेत यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याची चर्चा या क्षेत्रात सुरू आहे.

राज्यातली सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या माध्यमातून होतात. त्यामध्ये सुमारे ८० हजार गृहनिर्माण संस्थांचा समावेश आहे. सरकारने २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना निवडणूक प्राधिकरणाच्या कक्षेतून वेगळे करीत या सोसायटींना स्वतंत्रपणे निवडणुकीची मुभा दिली आहे. त्यासाठी सरकारने सहकार कायद्यात सुधारणा केली असली तरी २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सोसायटींच्या निवडणुका नेमक्या कशा पद्धतीने व्हाव्यात याबाबत नियम करण्यासाठी सरकारने एक समिती गठित केली आहे.

या समितीचा अहवाल येण्यास लागणारा विलंब आणि विधानसभा निवडणुका यामुळे नवीन नियम होण्यास विलंब लागणार असल्याचे सांगत या निवडणुका ३१ डिसेंबपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर अन्य सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका विधानसभेची रणधुमाळी संपेपर्यंत म्हणजेच ३१ ऑक्टोबपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच विविध सहकारी संस्था तसेच गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता.

सहकारी संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत सत्तासंघर्ष उफाळून येत असतो. त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता असल्याने या सर्वच निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जाते. मात्र ज्या संस्थांची निवडणूक घोषित झाली आहे त्यांना या निर्णयातून वगळण्यात आले असून त्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार होतील असेही सहकार विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 2:52 am

Web Title: co operative society elections postponed to october zws 70
Next Stories
1 वाहतूक नियमांच्या उल्लंघनात वाढ
2 टोलमुक्तीची आश्वासने हवेतच
3 ईशान्य मुंबईत युतीला आव्हान
Just Now!
X