सुविधा न दिल्याप्रकरणी ‘ऑक्सफर्ड टय़ुटर्स अकॅडमी’ दोषी
ग्राहक हक्कांना डावलणे वा त्याकडे दुर्लक्ष करणे कसे महागात पडू शकते याचा प्रत्यय अंधेरी येथील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिकवण्या घेणाऱ्या संस्थेला नुकताच आला. १२ वीच्या विद्यार्थिनीला शिकवणीच्या अमुक सुविधा देण्याचे मान्य करून त्या पूर्ण न केल्याप्रकरणी ग्राहक न्यायालयाने अंधेरीच्या लोखंडवाला संकुलातील ‘ऑक्सफर्ड टय़ुटर्स अ‍ॅकेडमी’ला दोषी ठरवले आहे. एवढेच नव्हे, तर २०१३ सालच्या बॅचमधील ज्या विद्यार्थिनीने सुविधा न दिल्याप्रकरणी संस्थेला ग्राहक न्यायालयात खेचले होते, तिला संस्थेने नुकसानभरपाई म्हणून ३.६४ लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
यात शुल्काच्या ५४ हजार रुपयांच्या परताव्यासह तीन लाख रुपये मानसिक त्रासासाठीच्या भरपाईचा समावेश आहे. तर कायदेशीर लढाईसाठीचा खर्च म्हणून १० हजार रुपयेही देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. संस्थेतर्फे दहावी,
बारावी आणि एचएससी, सीबीएसई आणि आयसीएसईच्या मुलांसाठी शिकवण्या घेण्यात येतात. २०१३ मध्ये बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या अभिव्यक्ती वर्मा हिने गणित आणि रसायनशास्त्राच्या शिकवणीसाठी संस्थेत नावनोंदणी केली होती.
त्यानुसार अनुभवी शिक्षक तिला शिकवण्यासाठी तिच्या घरी येणार होता. परंतु महिना उलटला तरी रसायनशास्त्राचा शिक्षक तिच्या घरी फिरकलाच नाही. शिवाय गणित शिकवणारा शिक्षकही हिंदूी भाषिक असल्याने तो तिला इंग्रजीमध्ये गणित शिकवू शकत नव्हता. व्यवसायाने वकील असलेली अभिव्यक्तीची आई नीना यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर संस्थेने अभिव्यक्तीला रसायनशास्त्र शिकवण्यासाठी एक शिक्षक पाठवला. मात्र तो आयसीएसईच्या आठवीच्या विद्यार्थ्यांचा शिक्षक असल्याचे उघड झाले.
संस्थेच्या या ढिसाळ कारभारामुळे मुलीचे वर्ष वाया जाईल या भीतीने नीना यांनी पुन्हा संस्थेत धाव घेतली. त्या वेळेस प्रश्नपत्रिका सोडवण्यास अभिव्यक्तीला मदत करण्यासाठी एका आयआयटी विद्यार्थ्यांला पाठवण्यात आले; परंतु तोही अभिव्यक्तीला अभ्यासात हवी तशी मदत करू शकला नाही.
संस्थेच्या या अनागोंदी कारभारामुळे तणावाखाली आलेली अभिव्यक्ती भौतिक-रसायन आणि गणितात ६० टक्केही मिळवू शकली नाही. परिणामी तिचे हैदराबाद येथील महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याचे स्वप्न भंगले. नंतर महाविद्यालय व्यवस्थापनाशी चर्चा करून तिला प्रवेश मिळाला. शिकवणी देण्यासह, अभ्यासाची उजळणी घेणे आणि प्रश्नपत्रिका सोडवण्यात मदत केली जाईल, असे आश्वासन संस्थेने दिले होते. परंतु यातील एकही आश्वासन न पाळल्याप्रकरणी २०१५ मध्ये नीना यांनी अखेर ग्राहक न्यायालयात संस्थेविरोधात धाव घेतली. न्यायालयाने तक्रारीची दखल घेत संस्थेला नोटीस बजावली. मात्र संस्थेतर्फे त्यावर उत्तर दाखल करण्यात आले नाही. मुलांना चांगले गुण मिळावेत यासाठी शिकवण्या असतात. मात्र या प्रकरणी नेमके उलट चित्र पाहायला मिळत असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले.
दरम्यान, संस्थेने मात्र अभिव्यक्तीलाच कमी गुण मिळवण्यासाठी जबाबदार ठरवले आहे. एकाच वेळेस ती बऱ्याच संस्थांकडून शिकवण्या घेत होती. त्यामुळेच अभ्यासात तिचा गोंधळ होऊन तिला कमी गुण मिळाल्याचा दावा संस्थेकडून करण्यात आला आहे.