21 October 2018

News Flash

नारळ, सुके खोबरे महाग

मोठा नारळ ५५ रुपयांना तर खोबऱ्याच्या दरांत किलोमागे ८० रुपयांची वाढ

मोठा नारळ ५५ रुपयांना तर खोबऱ्याच्या दरांत किलोमागे ८० रुपयांची वाढ

स्वयंपाकात प्रामुख्याने वापरला जाणारा आणि धार्मिक कार्यामध्ये अग्रस्थानी असणाऱ्या नारळाच्या भडकलेल्या दरांनी सर्वसामान्यांसाठी नववर्षांची ‘महाग’ सुरुवात केली आहे. ओखी वादळाचा नारळ उत्पादनाला मोठा फटका बसल्याने दक्षिण भारत आणि कोकणातून होणारी नारळाची आवक कमी झाली असून याचा परिणाम नारळ आणि सुक्या खोबऱ्याच्या किमती वाढण्यात झाला आहे. मोठय़ा आकाराच्या नारळाचे दर नगामागे १५ रुपयांनी वाढले असून सुके खोबरेही तब्बल २५० रुपये किलो दराने विकले जात आहे.

भारतीय स्वयंपाकात नारळ आणि सुक्या खोबऱ्याला विशेष स्थान आहे. इडली, डोशाच्या चटणीपासून डाळीच्या वरणापर्यंत अनेक पदार्थामध्ये नारळाचा वापर केला जातो. मांसाहारी पदार्थामध्येही सुके खोबरे हमखास वापरले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून नारळाच्या दरांत घसघशीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आकारानुसार नारळाच्या किमती आठ ते १५ रुपयांनी महागल्या आहेत. तसेच सुक्या खोबऱ्याच्या दरात देखील किलोमागे ५० ते ८० रुपयांनी वाढ झाली आहे. दसऱ्यापासून नारळाचे दर वाढले असून ओखी वादळानंतर हे दर अधिक वाढल्याचे मुंबईतील नारळ विक्रेते आणि व्यापारी सांगत आहेत.

मुंबईत होणारा नारळाचा ७५ ते ८० टक्के पुरवठा हा केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यातून होतो. तर उर्वरीत २० ते २५ टक्के पुरवठा हा कोकणभूमीतील मालवण, राजापूर, रत्नागिरी या भागातून केला जातो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही क्षेत्रांमधून नारळाची होणारी आवक काही प्रमाणात घटली आहे. मुंबईच्या दिशेने नारळाच्या होणाऱ्या वाहतूकखर्चात शिवाय त्यासाठी लागणाऱ्या मजुरीच्या खर्चात वाढ झाल्याने नारळाच्या दरात दसऱ्यापासून वाढ झाल्याची माहिती दादर येथील किरकोळ बाजारातील नारळ विक्रेते संजय गुरव यांनी दिली. तसेच खाद्यतेलनिर्मितीकरिता कंपन्या थेट नारळ उत्पादकांकडूनच नारळांची खरेदी करतात. हे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढले आहे. त्यामुळे नारळ उत्पादक ज्या वाढीव दराने कंपन्यांना नारळांचा पुरवठा करतात त्याच दराने ते व्यापाऱ्यांनाही नारळाचा पुरवठा करत असल्याची माहिती एपीएमसीतील एका व्यापाऱ्याने दिली. ओखी वादळाचा फटका केरळ, तामिळनाडू आणि कोकण किनारपट्टीला बसला आणि त्याचा परिणाम नारळाच्या पुरवठय़ावर झाल्याने डिसेंबर महिन्यापासून दर अजून वाढल्याचे घाऊक बाजारातील नारळाचे व्यापारी सदाशिव पाटील यांनी सांगितले.

 

First Published on January 13, 2018 1:22 am

Web Title: coconut price increase in mumbai