वर्गणीपासून विसर्जनापर्यंतच्या काळासाठी नियमावली; देखाव्यांतून राजकीय पक्षांवरील टीका टाळण्याची सूचना

दिवसेंदिवस सार्वजनिक गणेशोत्सवाचे विद्रूपीकरण होत चालल्याची टीका समाजातून होऊ लागल्यामुळे गणेशोत्सव समन्वय समितीने यंदाच्या गणेशोत्सवासाठी आचारसंहिता जाहीर केली आहे. वर्गणीसाठी कोणालाही जबरदस्ती करू नये, ध्वनिक्षेपकांच्या बाबत नियमांचे काटेकोर पालन करावे, प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेला प्रसाद स्वीकारू नये, अतिरेकी कारवायांच्या व दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय करावे, देखाव्यांमधून कुठल्याही राजकीय पक्षावर टीका करू नये, अशी भलीमोठी नियमावली समन्वय समितीने तयार केली आहे.

निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास अद्याप वेळ असला, तरी सार्वजनिक गणेश मंडळांना मात्र समन्वय समितीने तब्बल २४ पानी आचारसंहिता जारी केली आहे. मुंबईत एकूण १३,३४७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. काही सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बेताल वागण्यामुळे उत्सवाला गालबोट लागते. काही दिवसांपूर्वी ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ या मंडळाच्या आगमन मिरवणुकीच्या वेळी जो धांगडधिंगा झाला, त्यावरू न पुन्हा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे समन्वय समितीने मंडळांसाठी आचारसंहिता जारी केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी दिली.

उत्सव बेरंग होऊ नये, याकरिता सूचना देण्याबरोबरच अतिरेकी हल्ला किंवा बॉम्बसदृश वस्तू दिसल्यास किंवा आपत्कालीन दुर्घटना झाल्यास काय करावे, याचाही आढावा नियमावलीत घेण्यात आला आहे.

आचारसंहिता अशी..

* स्वखुशीने देणाऱ्यांकडून वर्गणी गोळा करावी, कोणावरही जबरदस्ती करू नये, वर्गणीची पावती द्यावी.

* वाहतुकीस अडथळा होणार नाही याची खबरदारी घेऊनच मंडप उभारावे.

* मंडपातील देखावे आक्षेपार्ह नसावे. इतर धर्मीयांच्या भावना दुखवणारे तसेच कुठल्याही राजकीय पक्षावर किंवा कोणावरही वैयक्तिक टीका करणारे नसावेत.

* विसर्जन मिरवणुकांमध्ये एकाच जागी थांबून नाचत राहू नये, मागून येणाऱ्या मिरवणुकांना अडथळा करू नये.

* प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेले पूजेचे साहित्य नाकारावे.

* अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंडपाभोवती मेटल डिटेक्टर बसवावे, भाविकांच्या हातातील वस्तूंची पाहणी करावी.

ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत स्वतंत्र नियमावली

गणेशोत्सव मंडपात लावल्या जाणाऱ्या ध्वनिक्षेपकांवरून गेल्या काही वर्षांत पर्यावरणवाद्यांनी न्यायालयात खटले दाखल केले होते. त्या पार्श्वभूमीवर ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत स्वतंत्र नियमावली समन्वय समितीने दिली आहे. ध्वनिक्षेपक नेमून दिलेल्या वेळेतच लावावे तसेच उत्सव कालावधीत नेमून दिलेल्या चारच दिवशी १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक लावावे. अन्य दिवशी १० वाजेपर्यंतच ध्वनिक्षेपक लावावे. धार्मिक गाणी, भक्तिगीते, मंगलमय वातावरण करणारे संगीत लावावे, असे त्यात म्हटले आहे. ध्वनिवर्धक व ध्वनिक्षेपक मंडपात लावताना कंत्राटदाराला याबाबत माहिती द्यावी, कंत्राटदाराशी तसा करार करावा. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन झाल्यास कंत्राटदाराला जबाबदार धरता येईल, अशाही सूचना यात देण्यात आल्या आहेत.