महाराष्ट्रातील वीज परिस्थितीत झालेली सुधारणा व उद्योगांना भारनियमनातून मुक्ती मिळाल्याच्या पाश्र्वभूमीवर भारनियमनामुळे बेजार झालेल्या तामिळनाडूतील कोइम्बतूर येथील उद्योगांनी महाराष्ट्रात स्थलांतर करण्याचा विचार सुरू असल्याचे जाहीर केले आहे.
तामिळनाडूत उद्योगांना रोज १० ते १४ तासांचे भारनियमन आहे. त्यामुळे तेथील उद्योजक बेजार झाले आहेत. कारखाना सुरू ठेवायचा तर त्यांना जनरेटरवर वीजनिर्मिती करावी लागते व तो दर सुमारे १२ रुपये प्रतियुनिट इतका पडतो. त्यामुळे कारखाना चालवणे तेथील उद्योजकांसाठी कठीण झाले आहे.
कोईम्बतूर हे तामिळनाडूतील मोठे औद्योगिक केंद्र आहे. तामिळनाडूत वीज परिस्थिती बिकट असताना महराष्ट्रात मात्र विजेच्या परिस्थितीत चांगलीच सुधारणा झाली आहे. ८० टक्के राज्य भारनियमनमुक्त झाले असून उद्योगांना तर गेल्या वर्षभरापासून २४ तास वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे व्यवसाय वाचवण्यासाठी तामिळनाडूत राहण्याऐवजी महाराष्ट्रात जाऊन उद्योग काढणे परवडणारे असल्याचे तेथील उद्योजक के. रामस्वामी यांनी जाहीर केले. तसेच महाराष्ट्रात वा गुजरातला स्थलांतराबाबत विचार सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात आता उद्योगांना रात्रीच्या वीजवापरासाठी अडीच रुपये प्रतियुनिट इतकी सवलत दिली जात आहे. शिवाय औद्योगिक भारनियमनच रद्द झालेले असल्याने अखंड वीजपुरवठय़ासाठी असलेला ५० पैसे प्रतियुनिटचा जादा दरही कमी करण्यात आला आहे. त्यामुळे वीज परिस्थिती बिकट असलेल्या राज्यांना आता गुजरातबरोबरच महाराष्ट्राचाही आधार वाटू लागला आहे.