दुकानदारांच्या अडचणीत वाढ; ९० टक्के व्यवसाय बुडाल्याचा दावा

अमर सदाशिव शैला, लोकसत्ता

मुंबई : परदेशी पर्यटकांनी गजबजलेला दक्षिण मुंबईतील कुलाबा बाजार यंदा टाळेबंदीमुळे ओस पडला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पर्यटन बंद असल्याचा फटका या बाजाराला बसला असून दुकानदारांचा ९० टक्के व्यवसाय बुडाला आहे. त्यात संसर्गाच्या भीतीने बाजारात महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, सर्वसामान्य ग्राहक फिरकत नसल्याने अनेकांनी दुकाने बंद ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे.

दक्षिण मुंबईतील सर्वात जुन्या आणि प्रमुख बाजारांपैकी कुलाबा बाजार आहे. मुंबईत आलेला परदेशी पर्यटक येथे फे रफटका मारल्याशिवाय परतत नाही. मात्र टाळेबंदीनंतर पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. त्याचा सर्वाधिक फटका या बाजाराला बसला आहे.

येथे अंबालाल जैन यांचे ‘सिल्व्हर पॅलेस’ हे चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. इथल्या चांदीपासून घडविलेल्या भारतीय पद्धतीच्या आभूषणांना आणि शोभेच्या वस्तूंना परदेशी पर्यटकांची आणि परदेशस्त भारतीयांकडून मागणी असते. ‘दुकानातील ५० टक्के ग्राहक परदेशी असतो. मुंबईतील उच्चभ्रूही येथून आभूषणे खरेदी करतात. मात्र सध्या १० टक्केही व्यवसाय नाही,’ अशी व्यथा ते मांडतात.

मोहन मुखी यांच्या ग्लोबल टेक्सटाइल्स या दुकानातील सुती कापडाचे भारतीय पद्धतीचे कपडे परदेशी पर्यटकांना विशेष भावतात. ‘दुकानात येणारे ८० टक्के ग्राहक परदेशी आहेत. थोडेफारच स्थानिक खरेदीला येतात. सध्या पर्यटक नाहीत. त्यामुळे दुकानात खरेदीसाठी ग्राहकच येत नाहीत. त्यामुळे दिवसभर दुकान सुरू ठेवून वीज बिलाचा खर्च वाढविण्याऐवजी दोन तासांसाठीच उघडतो,’ अशी माहिती मुखी देतात.

अकबर प्लाझा हे कपडय़ाचे दुकान चालविणारे अरुण कुमार टाळेबंदीदरम्यान सर्व बचत संपल्याचे सांगतात. नवीन माल घेण्याकरिताही पैसे नाहीत. उत्पन्नाअभावी तिघांना कामावरून कमी केले आहे. दुकानात ४० टक्के  परदेशी ग्राहक खरेदीला येत.  लोकल रेल्वेसेवा सुरू केल्यास ग्राहकांची संख्या वाढेल, असे अरुण सांगतात.

‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करा’

‘कुलाबा बाजारातील ३० टक्के  दुकानदारांनीच त्यांची दुकाने उघडली आहेत. येथील दुकानदारांचा ६० टक्के व्यवसाय पर्यटकांवर अवलंबून आहे. सध्या ५ टक्केही व्यवसाय नाही. दिवसभरात अनेकांच्या दुकानात एकही ग्राहक फिरकत नाही. आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या येण्याची शक्यता नाही. मात्र किमान राज्यातील पर्यटनाला चालना द्यावी. राज्यातील पर्यटक मुंबईतील बाजारात येऊ शकेल यासाठी वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी,’ अशी मागणी कुलाबा रेसिडेंट अँड शॉपकिपर असोसिएशनचे अध्यक्ष हरेश हाथीरामानी यांनी केली आहे.