किमान तापमानही घटण्याची शक्यता

मुंबई : मुंबईच्या कमाल तापमानात बुधवारी साडेतीन अंशाने घट झाली असून, गुरुवारपासून किमान तापमानातदेखील घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा थंडीचा अनुभव मिळेल.

वर्षांच्या सुरुवातीस मुंबई आणि परिसरातील किमान तापमानात मोठी घट होऊन काही ठिकाणी तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत उतरले होते. मात्र त्यानंतर महिनाभर तापमानात वाढच झाली होती. या आठवडय़ाच्या सुरुवातीपासूनच मुंबईच्या कमाल तापमानात घट होण्यास सुरुवात झाली. मंगळवारी कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस खाली घसरले होते, त्यात बुधवार साडेतीन अंशाची घट झाली.

बुधवारी दुपारपासूनच तापमानात घट व्हायला सुरुवात होऊन सायंकाळी त्यामध्ये आणखीन घट झाली. सायंकाळी हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रावर २६.८ अंश तर कुलाबा येथे २६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. बुधवारी किमान तापमान १९.४ अंश नोंदविण्यात आले तर गुरुवारपासून किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई परिसरात किमान तापमान पुढील काही दिवस १५ अंश सेल्सिअसच्या खाली जाऊ शकते.

दरम्यान बुधवार सकाळपर्यंत राज्यातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात अनेक ठिकाणी ११ ते १६ अंश सेल्सिअस, तर विदर्भात १५ ते १७ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ११.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

बुधवारी सायंकाळी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात कमाल तापमान २६ अंशापर्यंत कमी झाले. महाबळेश्वर येथे कमाल तापमान २१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. पुढील दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.