सात शवपेटय़ांची खरेदी; अटी आणि शुल्काबाबात मसुदा तयार करण्याचे काम सुरू

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार होईपर्यंत त्याचा मृतदेह काही कारणास्तव पाच सहा तासांहून अधिक काळ ठेवावा लागल्यास अशा परिस्थितीत नागरिकांच्या सोयीसाठी फिरत्या शवपेटय़ा देण्याचा पालिकेचा विचार आहे. प्रायोगिक तत्त्वावर अशा सात पेटय़ा घेण्याचा पालिका विचार करीत आहे. मात्र या पेटय़ा देताना काय अटी असाव्यात, त्याचे शुल्क किती असावे याबाबतचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईकरांना खासगी शवपेटय़ांऐवजी पालिकेच्या शवपेटय़ांची सुविधा मिळण्याची शक्यता आहे.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार होईपर्यंत त्याचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवला जातो. त्यातच रात्री निधन झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर अनेकदा दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार केले जातात. अशा परिस्थितीत मृतदेहाच्या विघटनाची प्रक्रिया सुरू होते. एखाद्या व्यक्तीचा संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाल्यास त्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा परिस्थितीत पालिकेने मृतदेहांसाठी फिरत्या शवपेटय़ा मोफत पुरवाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी केली होती. या मागणीवर पालिका प्रशासन सकारात्मक विचार करीत आहे. मुंबईत सध्या खासगी स्वरूपात शीत शवपेटय़ा पुरवल्या जातात. मात्र त्याचे दर खूप जास्त असल्यामुळे सर्वसामान्यांना ते परवडत नाहीत. तर पालिकेच्या रुग्णालयात असलेल्या शवागारात मृतदेह मोफत ठेवण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र शवागारातून मृतदेह लांब असलेल्या घरी नेईपर्यंत त्यातून रक्तमिश्रित पाणी वाहू लागते. त्यामुळे फिरत्या शवपेटय़ांची आवश्यकता असल्याचे सईदा खान यांचे म्हणणे आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाने अशा फिरत्या शीत शवपेटय़ा देण्याचा विचार केला आहे. एका शवपेटीची किंमत ६५ हजार रुपये असून प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक परिमंडळासाठी एक याप्रमाणे सात शवपेटय़ा खरेदी केल्यास साडेचार लाख रुपये खर्च करावा लागणार आहे. मात्र या शवपेटय़ा दिल्यास त्याचा दुरुपयोग होण्याचीही शक्यता आहे, तसेच ने- आण करताना होणारे नुकसान, त्याची देखभाल, अनामत रक्कम, तसेच शवपेटी परत आणली नाही तर नुकसानभरपाई या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोग्य समितीमध्ये नगरसेवकांनी या सर्व मुद्दय़ांवर चर्चा करून निर्णय घ्यावा, असे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत.

मृतदेहांवर पालिकेचा खर्च

पालिकेतर्फे मृतदेहांवर आधीच मोठय़ा प्रमाणावर खर्च केला जात आहे. हिंदू स्मशानभूमीमध्ये जळावू लाकडांचा मोफत पुरवठा केला जातो. ७८३ रुपये प्रति १०० किलो या दराने प्रति मृतदेह दहनासाठी २३४९ रुपये किमतीचे ३०० किलो लाकूड मोफत पुरवले जाते. मुस्लीम दफनभूमीमध्ये लहान मुलांसाठी ८०० रुपये, तर मोठय़ा माणसांच्या मृतदेहासाठी १६०० रुपयांपर्यंत दफनासाठी बर्गा फळ्या पुरवण्यात येतात. हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन स्मशानभूमीमध्ये दफनासाठी लागणारे शुल्कही माफ करण्यात आलेले आहे.