राज्यातील कमाल तापमानात गेल्या दोन दिवसांत मोठी वाढ झाली असून, अनेक ठिकाणी पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. तर राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या वरच राहिले.

गेल्या आठवडय़ात वाऱ्यांची दिशा बदलल्यानंतर राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ होऊ लागली. किमान तापमानातील वाढ तुलनेने कमी असून, कमाल तापमानात मोठी वाढ दिसून आली. परभणी, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती या ठिकाणी पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला. त्यामुळे सकाळी गारवा आणि दिवसा वाढलेल्या तापमानामुळे उन्हाळ्याचा अनुभव आला.

तुलनेने गेल्या आठवडय़ात ३५ अंश पार केलेले मुंबईचे कमाल तापमान दोन दिवसांत काही प्रमाणात कमी झाले. रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३२.६ अंश, तर किमान तापमान १९.२ अंश नोंदविण्यात आले.

विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर येथे १२.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)

मुंबई ३१.२, सांताक्रुझ ३२.६, रत्नागिरी ३३.१, पुणे ३३.६, जळगाव ३४.०, कोल्हापूर ३३.७, महाबळेश्वर ३०.२, मालेगाव ३३.६, नाशिक ३१.५, सांगली ३५.२, सातारा ३४.१, सोलापूर ३६.३, उस्मानाबाद ३३.२, औरंगाबाद ३२.८, परभणी ३४.५, नांदेड ३३.०, अकोला ३४.६, अमरावती ३३.६, बुलडाणा ३१.०, ब्रह्मपुरी ३४.०, गोंदिया २९.४, वर्धा ३२.०, यवतमाळ ३१.५.