श्वसनसंबंधी आजारांच्या रुग्णांतही वाढ

मुंबई : गेल्या आठवडय़ाच्या उत्तरार्धात घसरलेल्या तापमानाने सोमवारपासून उसळी घेतल्याने मुंबईकरांना पुन्हा उकाडय़ाला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच दिवसा कडक ऊन आणि रात्री गारवा अशा वातावरणामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवत आहेत. शहरात सध्या सर्दी, खोकला तसेच तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असून श्वसनसंबंधी आजारांचे प्रमाणही वाढत आहे.

शहरातील किमान तापमानासह कमाल तापमानाचा पाराही गेल्या आठवडय़ात खाली उतरला होता. त्यामुळे दिवसासुद्धा हवेत गारवा जाणवत होता. गेल्या चार दिवसांमध्ये पुन्हा तापमानाचा पारा चढला आहे. रात्री काही अंशी हवेत थंडावा असला तरी दिवसा मात्र कडक उन्हाचे चटके बसत आहेत. विषाणूंच्या वाढीस हे अनुकूल वातावरण असते. तापमान चढउतारामुळे शहरात संसर्गजन्य आजार परसण्यास सुरुवात होत आहे. सर्दी, खोकल्याच्या तक्रारींसह तापाच्या रुग्णांची संख्या तुलनेने काही प्रमाणात वाढली आहे. घसा खवखवणे, अंगदुखीची लक्षणे ही रुग्णांमध्ये आढळून येत असल्याचे फॅमिली डॉ. सुरेश माने यांनी सांगितले.

पालिका रुग्णालयांमध्येही संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असून श्वसनाशी निगडित आजारांच्या रुग्णांचे आजार विशेष करून या काळात वाढले आहेत. दमा, ब्रॉण्कायटिस यासह अ‍ॅलर्जीच्या रुग्णांनाही अधिकतर त्रास या दिवसांत होत असल्याची माहिती उपनगरीय रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.