News Flash

राज्यात पुन्हा गारठा

राज्यात ९ ते १२ नोव्हेंबरदरम्यान थंडीची लाट आली होती.

अहमदनगरचा पारा ८ अंश सेल्सियसवर

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर  राज्याच्या बहुतांश भागात पुन्हा कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. उत्तरेकडील राज्ये थंडीने गारठून गेल्याने आणि उत्तरेकडून वारे वाहत असल्याने राज्याच्या उत्तर भागासह सर्वच जिल्ह्यांमध्ये काही दिवस तापमान गडगडण्याचा अंदाज हवामान केंद्राकडून व्यक्त करण्यात आला. सोमवारी अहमदनगरचा पारा ८ अंश सेल्सियसवर घसरला.

राज्यात ९ ते १२ नोव्हेंबरदरम्यान थंडीची लाट आली होती. त्यात अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, पुण्यासह अनेक जिल्हे गारठले होते. अहमदनगरमधील किमान तापमान तर ७.१ अंश से.पर्यंत खाली आले होते. विदर्भात नागपूर, गोंदिया येथील तापमानही खाली उतरले होते. मुंबईतील किमान तापमानही तब्बल ५ अंश से.ने घसरले होते. त्यानंतर मात्र उत्तर महाराष्ट्राचा अपवाद वगळता बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान सरासरी पातळीएवढे झाले.

मात्र आता उत्तरेतील थंडीच्या लाटेचे परिणाम राज्यात दिसू लागले आहेत. १९ नोव्हेंबरपासून राज्याच्या सर्वच भागांतील तापमान खाली उतरत आहे. सोमवारी राज्यातील सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे ८ अंश से. नोंदले गेले.

उत्तरेत आलेली थंडीची लाट, वाऱ्यांची दिशा यामुळे येत्या काही दिवसांत उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार आहे.

राज्याच्या इतर भागांतही बुधवारी किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे, असे मुंबई हवामान विभागाने म्हटले आहे.

प्रमुख जिल्ह्यचे तापमान

मुंबई – १६.४ अंश से. , नाशिक – ९ अंश से, पुणे – ९.६ अंश से. नागपूर – ११.१ अंश से., रत्नागिरी – १७.७ अंश से., जळगाव – १०.८ अंश से., औरंगाबाद – ११.५ अंश से. , महाबळेश्वर – १४.६ अंश से.

मुंबईत १६.४ अंश से.

शनिवार रात्रीपासून शहरात गार वारे वाहू लागले असून, रविवारी सांताक्रूझ येथे किमान तापमान १६.४ अंश से.पर्यंत खाली आले. सोमवारी सकाळीही तापमापकातील पारा १६.४ अंश से.पर्यंत घसरला होता. याआधी १० आणि ११ नोव्हेंबर रोजीही तापमान १६.४ अंश से.पर्यंत कमी झाले होते. नोव्हेंबरमध्ये गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी तापमान २६ नोव्हेंबर २००७ रोजी १४.४ अंश से. नोंदले गेले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 1:46 am

Web Title: cold increase in maharashtra
Next Stories
1 कळवा-मुंब्रादरम्यान रुळाला तडे; मध्य रेल्वे विस्कळीत
2 सायरस मिस्त्रींनी कंपनीचे मोठे नुकसान केले: टीसीएस
3 विजय मल्ल्याच्या अडचणी वाढल्या, कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट
Just Now!
X