करोना प्रतिबंधात्मक लशीचे वितरण आणि साठवणुकीसाठी आवश्यक शीतगृहांची सुविधा राज्याला केंद्रीय आरोग्य विभागाकडून डिसेंबर अखेरपर्यत मिळणार आहे. तसेच प्राधान्याने लस देण्यात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नोंदणीसाठी ‘कोविल’अ‍ॅप ही उपलब्ध केले जाणार आहे.

विविध कंपन्याच्या करोना प्रतिबंधात्मक लशी बाजारात दाखल होण्यासाठी स्पर्धा सुरू असताना यांचे वितरण आणि साठवणुकीची तयारी करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक शीतगृहांची सुविधा केंद्रीय आरोग्य विभागाकडून राज्यात पुरविली जाणार आहे. कोणत्या प्रकारची लस उपलब्ध केली जाईल, याची माहिती अद्याप राज्याला केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेली नाही. परंतु सर्वसाधारणपणे लशीच्या कुप्या २ ते ८ अंश से. तापमानाखाली ठेवणे गरजेचे असते. त्यानुसार २ ते ८ अंश से. तापमानाखाली जतन करण्याची सुविधा असलेल्या सहा शीतपेटय़ा, तर – १५ ते -२० अंश से.तापमानाखाली ठेवण्याची सुविधा असलेल्या दोन अशा आठ मोठय़ा शीतपेटय़ा (वॉकिंग कुलर आणि वॉकिंग फ्रिजर) पुरविल्या जातील असे  केंद्रीय आरोग्य विभागाने राज्याला कळविले आहे.

लशीचे वितरण पोलिओ किंवा अन्य लशीप्रमाणे केले जाईल. पुण्याच्या मुख्य लसीकरण केंद्रात प्रथम याचा पुरवठा केंद्रीय आरोग्य विभाकडून केला जाईल. येथून मुंबई, ठाणे, पुणे,औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर, अकोला आणि अकोला राज्यातील ९ स्थानिक केंद्रामध्ये केला जाईल. पुढे जिल्हा आणि तालुका पातळीवर वितरण करण्यासाठी २०० लीटर क्षमतेच्या १०१, तर १०० लीटर क्षमतेच्या ५७६ शीतपेटय़ाही केंद्राकडून दिल्या जाणार आहेत. ही सामुग्री डिसेंबर अखेरपर्यत प्राप्त होणार असल्याची माहिती राज्य लसीकरण विभागाचे अधिकारी डॉ. डी.एन.पाटील यांनी दिली.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार, राज्यात खासगी आणि सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती प्राधान्याने लस देण्यासाठी नोंद केली जात आहे. यात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मागणीनुसार, खासगी दवाखान्यातील डॉक्टरांची माहितीही संकलित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सध्या ही माहिती जिल्हा पातळीवर घेतली संकलित के ली जात असून लवकरच केंद्राकडून यासाठी ‘कोविल’नावाचे अ‍ॅपही उपलब्ध केले जाईल. जिल्हा पातळीवर हे अ‍ॅप उपलब्ध झाल्यानंतरच लसीकरणासाठी नोंद केलेल्या एकूण आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या समजू शकेल, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुण्याच्या मुख्य लसीकरण केंद्रात प्रथम शीतगृह सामग्रीचा पुरवठा केंद्रीय आरोग्य विभाकडून केला जाईल. ही सामुग्री डिसेंबर अखेपर्यंत राज्याला मिळले.

– डॉ. डी. एन. पाटील, अधिकारी राज्य लसीकरण विभाग

मुंबईत पोलिओ लसीकरणासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा करोना लसीकरणासाठी पुरेशा आहेत. त्यामुळे सध्या तरी स्वतंत्र व्यवस्थेची निर्मिती करण्याचा विचार नाही.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयमुक्त, मुंबई महापालिका