भाजपची शिवसेनेवर आगपाखड

‘मेट्रो ३’ प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेला संघर्ष आता आणखी चिघळला असून भाजपने या मुद्दय़ावर थेट शिवसेनेच्या शाखांनाच लक्ष्य केले आहे. ‘मुंबई मेट्रो-३’ प्रकल्पामुळे गिरगाव तसेच काळबादेवीमधील एकाही व्यक्तीला विस्थापित व्हावे लागणार नाही. उलट ज्यांची घरे या रेल्वे प्रकल्पांतर्गत येतील त्यांना आहे त्या ठिकाणीच दुप्पट क्षेत्रफळाचे घर मिळणार आहे. मात्र, गिरगावकरांच्या घरांऐवजी आपल्या शाखांना लागणारी ‘घरघर’ सेनेला अस्वस्थ करत आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या साथीने शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध करण्याचा उद्योग सुरू केल्याची टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी गुरुवारी केली.

शिवसेना-भाजपमध्ये महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सध्या जोरदार ‘तू तू मै मै’ सुरू असून त्याचे प्रत्यंतर महापालिकेच्या वेगवेगळ्या समित्यांमध्ये रोजच्या रोज दिसत असते. तथापि मेट्रो-३ हा प्रकल्प भाजपसाठी महत्त्वाचा असून मुख्यमंत्रीही त्यासाठी आग्रही असल्यामुळे मुंबई भाजपने आता शिवसेनेविरोधात थेट हल्ला बोल करण्याचे धोरण निश्चत केले आहे.

मेट्रो-३ प्रकल्पामुळे गिरगावकरांना विस्थापित तर व्हावे लागणार नाहीच, उलट त्यांना दुप्पट क्षेत्रफळाची घरे आहे तेथेच मिळणार असल्याचे आशीष शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ही योजना शासनाची असून काही वर्षांपूर्वी रिलायन्स मेट्रोचे काम सुरू होते तेव्हा घाटकोपर येथील २७०० लोकांना विस्थापित व्हावे लागले होते. तेव्हा मराठी माणसांच्या मुद्दय़ावर शिवसेनेने आवाज उठवला नव्हता याकडेही शेलार यांनी लक्ष वेधले. शिवसेनेला आता पोटशुळाचा त्रास होऊ लागला असून त्यावर वेळीच इलाज करण्याची गरज असल्याचेही शेलार यांनी सांगितले.

गिरगाव व काळबादेवी येथील काही इमारतींचा पुनर्विकासाचा करार विकासकांबरोबर झाला असून या बिल्डरांच्या भल्यासाठी मेट्रोच्या विकासाला विरोध करण्याचे काम शिवसेना करत असल्याचा आरोप शेलार यांनी केला. शिवसेनेला गिरगावकरांच्या घराची कोणतीही चिंता नाही, तर त्यांना आगामी काळात शिवसेनेच्या शाखांना जी घरघर लागणार आहे त्याची चिंता असल्याचा टोलाही शेलार यांनी लगावला.