06 December 2020

News Flash

राज्य गारठले, मुंबईत चढउतार

हवामानाच्या लहरीपणाचा सध्या मुंबईकरांना चांगलाच अनुभव येत असून एका दिवशी हुडहुडी भरायला लावणारे वारे तर दुसऱ्या दिवशी तापलेला सूर्य यांचे दर्शन होत आहे.

| January 10, 2015 02:28 am

हवामानाच्या लहरीपणाचा सध्या मुंबईकरांना चांगलाच अनुभव येत असून एका दिवशी हुडहुडी भरायला लावणारे वारे तर दुसऱ्या दिवशी तापलेला सूर्य यांचे दर्शन होत आहे. गुरुवारी या ऋतूमधील दुसऱ्या किमान तापमानाचा विक्रम झाल्यावर शुक्रवारी किमान तापमान लागलीच ३ अंश से.ने वाढले. उत्तरेतील थंडी, वाऱ्यांची दिशा व वेळ तसेच समुद्रावरील वाऱ्यांचा प्रभाव यामुळे असे चढ-उतार होत असल्याचे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
डिसेंबरच्या मध्यावर तापमान १२ अंश से.पर्यंत खाली गेल्यानंतर तापमानाने पुन्हा उसळी घेतली. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात तापमानात वाढ होण्याचा अंदाज होता. त्यानुसार पहाटेच्या तापमानात वाढ झाली. मात्र दुपारचे कमाल तापमान घटले.
उत्तरेतून येणाऱ्या थंड वाऱ्यांची वेळ बदलल्याचा हा परिणाम होता. त्यामुळे सकाळचे तापमान २० अंशांपर्यंत तर दुपारचे २७ अंश से.पर्यंत खाली आले होते. हेच तापमान आणखी काही काळ स्थिर राहील असा अंदाज असतानाच गुरुवारी किमान तापमानात पुन्हा घसरण झाली आणि १३.९ अंश से. या किमान तापमानाची नोंद झाली.
शुक्रवारी मात्र पुन्हा या तापमानाने उसळी घेतली. उत्तरेत नव्याने थंडीची लाट आली नसल्याने पुढील किमान तीन दिवस तरी तापमानात घट होणार नसल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
उत्तर भारतात सध्या तरी थंडीची लाट नाही. त्यामुळे मुंबईत पुढील तीन दिवस तापमानात घट होणार नाही. गेल्या काही दिवसांत तापमानात मोठे चढ-उतार दिसत आहेत. उत्तरेतील थंडीची लाट, वाऱ्यांची दिशा व वेळ, समुद्रावरून येणारे उबदार वारे यामुळे तापमानात चढ-उतार होत आहेत. मात्र मुंबईत हे सामान्य असल्याचे मुंबई वेधशाळेचे संचालक व्ही. के. राजीव म्हणाले. तापमानातील या चढउतारामुळे सर्दी-खोकला व तापाने मात्र अनेकजण हैराण आहेत.

किमान तापमान
९ जाने. – १७.२ (अंश से.)
८ जाने. – १३.९ (अंश से.)
७ जाने. – १६.५ (अंश से.)
६ जाने. – १८.२ (अंश से.)
५ जाने. – २०.४ (अंश से.)
४ जाने. – १६ (अंश से.)

पुणे ७.४, नाशिक ५.८, नागपूर ६.२ अंश
राज्याच्या अनेक भागांत थंडी वाढली असून, विशेषत: उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या बऱ्याचशा भागात तिचा कडाका वाढला आहे. त्याचाच परिणाम म्हणून पुणे ७.४, नाशिक ५.८, नागपूर ६.२ अंश अशा तापमानाची नोंद झाली.
पुढील दोन दिवसांतही असेच वातावरण कायम राहील, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंडी पुन्हा वाढली आहे. कोकण वगळता इतरत्र त्याची तीव्रता जाणवू लागली आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत तापमानात अचानक घट झाली. तेथे गारठय़ात कमालीची वाढ झाली असून थंडीच्या लाटेची स्थिती असल्याचे हवामान विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

ठिकठिकाचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
*कोकण : मुंबई (कुलाबा) २१, सांताक्रुझ १७.२, अलिबाग १७, रत्नागिरी १७.९, पणजी २०.२, डहाणू १५.६, भीरा १७
*मध्य महाराष्ट्र : पुणे ७.४, कोल्हापूर १५.५, सांगली १३.५, सातारा ८.१, महाबळेश्वर ११.२, सोलापूर ११.३, मालेगाव ८.४,
नाशिक ६.८
*मराठवाडा : औरंगाबाद ७.९, उस्मानाबाद ८.९, परभणी ९.६, नांदेड ६.५
*विदर्भ : अकोला ८.५, अमरावती १२.४, बुलडाणा १०.१, ब्रह्मपुरी ९.९, चंद्रपूर ११.८, नागपूर ५.३, वाशिम १३.२, वर्धा ८, यवतमाळ ८.४

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 2:28 am

Web Title: cold wave grips maharashtra indefinit wether in mumbai
Next Stories
1 निर्णय चुकीचा असल्यास हस्तक्षेप – मुख्यमंत्री
2 लाचखोर सहायक नगररचनाकारास अटक
3 वेंगुर्ला नगरपालिकेची पोटनिवडूणक रद्द
Just Now!
X