लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई / पुणे : नववर्षांच्या पहिल्याच दिवशी बुधवारी मुंबई परिसरात तापमानाचा पारा १५ अंशाच्या खाली गेला. सांताक्रूझ येथील हवामान विभागाच्या केंद्रावर किमान तापमान १५ अंश, तर बोरीवली १३.१९ अंश आणि पनवेल ११.०३ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. मुंबईकरांना पुढील आठ दिवस थंडीचा अनुभव घेता येईल. त्यानंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईबरोबरच कोकण आणि गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. विदर्भात तीन दिवस थंडीची लाट आली होती. अनेक ठिकाणी किमान तापमान ६ ते ८ अंशांपर्यंत खाली आले होते. कमी दाबाचे क्षेत्र विरल्यानंतर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात (पान) ३१ डिसेंबरला कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहातील अडथळे दूर झाल्याने नव्या वर्षांच्या पूर्वसंध्येपासून या विभागांत थंडीत वाढ झाली.

गेले चार ते पाच दिवस राज्यातील सर्वात कमी तापमान विदर्भात नोंदविले जात होते. मात्र, बुधवारी राज्यातील सर्वात कमी तापमान मध्य महाराष्ट्रातील नाशिक येथे १०.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुण्यात १०.८ अंश किमान तापमान नोंदविले गेले. सातारा येथील तापमान सरासरीच्या खाली आले आहे. महाबळेश्वर, कोल्हापूर, सांगली आदी भागांत तापमान सरासरीजवळ आले आहे. अलिबाग, रत्नागिरी आदी भागातही किमान तापमानात घट झाली आहे.