News Flash

‘कोल्ड प्ले’च्या सवलतींविरोधात मुख्य न्यायमूर्तीकडे तक्रार

या कार्यक्रमाला दिलेल्या सवलतींना वाटेगावकर यांनी आक्षेप घेतला आहे.

‘ग्लोबल सिटीझन’ ने आयोजित केलेल्या ‘कोल्ड प्ले’ या जगप्रसिद्ध वाद्यवृंदाच्या कार्यक्रमासाठी व महोत्सवासाठी राज्य सरकारने दिलेली मनोरंजन करमाफी आणि मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदान भाडय़ासाठी दिलेली ७५ टक्के सवलत याविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडे तक्रार केली आहे. राज्य सरकार व एमएमआरडीएकडून जनहित याचिका सादर करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे दिली जात नसल्याने आता न्यायालयानेच याप्रकरणाची दखल घेऊन योग्य ते आदेश द्यावेत, अशी विनंती या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

ग्लोबल सिटीझनने १९ नोव्हेंबर रोजी वांद्रे-कुर्ला संकुलात या महोत्सवाचे आयोजन केले असून त्यासाठी एमएमआरडीएचे मैदान २४ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबपर्यंत भाडय़ाने घेतले आहे. राज्य सरकार कार्यक्रमाचे सह आयोजक (होस्ट पार्टनर) आहे आणि खासदार पूनम महाजन आयोजनात ‘सक्रिय’ आहेत. त्यामुळे मैदानाच्या भाडय़ात ७५ टक्के सवलत देण्यात आली असून सुमारे सात कोटी रुपये मनोरंजन करमाफी देण्यात आली आहे. ही रक्कम शासनाच्या सूचनेनुसार सामाजिक कार्यासाठी वापरावी किंवा मुख्यमंत्री साहाय्यता निधीला द्यावी, त्याचे शासकीय लेखापरीक्षण व्हावे, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. मात्र ही माफी घेतल्यास कार्यक्रमाच्या आयोजनावरील खर्च उत्पन्नाच्या २० टक्के मर्यादेबाहेर जाऊ नये, अशी कायदेशीर तरतूद असून ८० टक्के निधी हा सामाजिक कार्यासाठी वापरण्याचे बंधन आहे. या कार्यक्रमाला दिलेल्या सवलतींना वाटेगावकर यांनी आक्षेप घेतला आहे. मायकेल जॅक्सनच्या कार्यक्रमाला दिलेली मनोरंजन करमाफी उच्च न्यायालयाने रद्द केली होती. त्याचा दाखला देऊन, याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती मुख्य न्यायमूर्तीकडे करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 1:41 am

Web Title: coldplay concessions issue
Next Stories
1 लोकसत्ता वृत्तवेध : एकमेका साह्य करू..!
2 स्वागत दिवाळी अंकांचे
3 बाद नोटांमुळे व्यापारी आबाद!
Just Now!
X