पंकज भोसले

शासकीय ग्रंथालयांसह स्थानिक पातळीवर वाचक घडविणाऱ्या गल्लोगल्ल्यांमधील ‘सर्क्युलेटिंग लायब्रऱ्या’ झपाटय़ाने बंद पडत असून कशीबशी तग धरलेल्या वाचनालयांसमोरचा आर्थिक संघर्ष गेल्या तीन-चार वर्षांमधील वाचक सभासदांच्या जोरदार घसरणीमुळे दिवसेंदिवस दाहक होत आहे. राज्याच्या अनेक शहरांतील हे वास्तव एका मोठय़ा चळवळीच्या अस्ताची चाहूल आहे.

साठोत्तरीत बहरलेल्या मराठी साहित्याप्रमाणे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरांबरोबरच गावोगावीही वाचनहौशी नागरिकांनी खासगी वाचनालये सुरू केली. शहरांच्या विकासासह जिल्हा वाचनालयांना पूरक असलेली सर्क्युलेटिंग ग्रंथालयेही जोरात सुरू होती. मुख्य धारेतील साहित्याप्रमाणेच रहस्यरंजन करणाऱ्या लोकप्रिय पुस्तकांसाठी तर ‘सर्क्युलेटिंग लायब्ररी’ हे हक्काचे घर होते.

‘विचित्र विश्व’सारख्या प्रति ‘रिडर्स डायजेस्ट’ मासिकापासून गुरुनाथ नाईक, बाबा कदम, चंद्रकांत काकोडकर, सुहास शिरवळकर, नारायण धारप, श्रीकांत सिनकर, कुमुदिनी रांगणेकर आणि चिंतामणी लागू हे येथे सर्रास ‘भेटणारे’ लेखक वाचकांच्या पसंतिक्रमात पहिल्या दहांमध्ये होते. टीव्ही, मोबाइलमुळे वाचनसंस्कृती लोप पावत असल्याच्या पारंपरिक तक्रारी दोन दशके सुरू असल्या, तरी या खासगी लायब्रऱ्यांतील वाचकांना अगदी अलीकडच्या काळापर्यंत ओहोटी लागली नव्हती. मात्र गेल्या तीन-चार वर्षांमध्ये वाचकांची संख्या निम्म्याहून अधिक घसरल्याने या खासगी ग्रंथालयांचे व्यावसायिक गणित पूर्णपणे कोलमडले. नवा वाचक नाही आणि ग्रंथालयाच्या देखभालीची आर्थिक व्यवस्थाही तोकडी पडू लागल्याने मुंबई-ठाणे-पुणे येथील सर्क्युलेटिंग वाचनालय चालकांना ती बंद करण्यावाचून कोणताच मार्ग उरला नाही.

कारणे काय?

सार्वजनिक वाचनालयांपेक्षा सर्क्युलेटिंग लायब्रऱ्यांकडे उत्तम व्यावसायिक कौशल्य होते. कित्येक शहरांत गुजराती-मारवाडी समुदायांतील व्यक्ती मराठी लायब्रऱ्या चालवत होते. त्यांनी पुस्तके-मासिकांच्या बळावर शहरामधील शासकीय ग्रंथालयांना समांतर अशी मोठी वाचनसंस्कृती घडविली होती. तीन-चार दशके नफ्यात असलेली ही वाचनालये एकाएकी वाचकसंख्या रोडावल्याने सुरू ठेवणे अवघड होऊन बसले. सभासद संख्या ८०० ते हजारवरून ३० ते १०० वर आल्याने शहरातील मोक्याच्या जागांवर असलेल्या या लायब्रऱ्या बंद करून दुसरा अधिक नफा देणारा व्यवसाय करणे किंवा त्या जागा भाडय़ाने देणे याकडे सर्क्युलेटिंग लायब्रऱ्या चालकांचा कल वाढला.