शिवसेनेनंतर भाजपचा आज जालन्यात सामूहिक लग्न सोहळा; प्रमुख नेत्यांची उपस्थिती

राज्यातील सत्ताधारी भाजप व शिवसेना या मित्र पक्षांमध्ये आता सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्याचीही स्पर्धा सुरू झाली आहे. शिवसेनेच्या वतीने शनिवारी औरंगाबाद येथे विविध धर्मातील २४४ जोडप्यांची लग्ने लावून देण्यात आली. या सामूहिक विवाह सोहळ्याला राज्यपाल विद्यासागर राव व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. आता उद्या रविवारी एक लाख वऱ्हाडींच्या साक्षीने ५५१ जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह समारंभ आयोजित केला आहे. भाजपच्या वतीने जलाना येथे होणाऱ्या या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत.

दुष्काळग्रस्त मराठवाडय़ातील शेतकरी कुटुंबांतील मुलामुलींचे सामूहिक विवाह लावून दिले जात आहेत. औरंगाबाद येथे शनिवारी पार पडलेल्या सामूहिक विवाहांमध्ये हिंदू, बौद्ध व मुस्लीम धर्मातील मुला-मुलींचा समावेश होता, असे शिवसेनेने म्हटले आहे.

भाजपच्या वतीने उद्या रविवारी जालना येथे ५५१ जोडप्यांचा सामूहिक विवाह होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या सोहळ्यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, गृहराज्यमंत्री राम शिंदे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, तसेच पक्षाचे पदाधिकारी  उपस्थित राहणार आहेत. एक लाख वऱ्हाडी सामूहिक लग्नासाठी जमणार आहेत.

शिवसेनेकडून २४४ जोडप्यांचे थाटामाटात विवाह

औरंगाबाद: दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करताना जात-धर्माच्या पलीकडे जाऊन शिवसेना विचार करते आणि हेच शिवसेनेचे हिंदुत्व आहे, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २४४ दाम्पत्याच्या सामुदायिक विवाहसोहळ्यास हजेरी लावली. सामुदायिक विवाहामुळे पाण्याची बचत होते आणि त्याचबरोबर हुंडा प्रथेलाही आळा घालता येऊ शकतो, असे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्यावतीने शहरातील अयोध्यानगरी भागात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा सामुदायिक विवाहसोहळा थाटामाटात केला.  २४४ वधू-वरांपैकी ४२ बौद्ध समाजातील, ८ मुस्लिम समाजातील, तर १९५ हिंदू समाजातील जोडप्यांचा विवाह त्या-त्या धर्मातील परंपरेनुसार लावण्यात आला.  शिवसेनेकडून नवविवाहित दाम्पत्यांना संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. मातोश्रीहून मणी मंगळसूत्र पाठविण्यात आले होते.

भव्य सोहळा

* कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य पटांगणावर समारंभ

* दुपारी १२ ते २ भोजन व्यवस्था , सायंकाळी ५.२० विवाह मुहूर्त

* प्रथम मुस्लीम, त्यानंतर बौद्ध, ख्रिश्चन व शेवटी िहदू धर्मातील जोडप्यांचे विवाह

* विवाह सोहळ्यासाठी २० टँकर्स पाण्याची व्यवस्था

*  प्रत्येक धर्मीयांसाठी स्वंतत्र पुरोहित , वधू-वरांना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप