राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या नामांकित महाविद्यालयांमध्ये यंदा प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा आहे. तरीही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांमधील प्रवेशाची अटीतटीची स्पर्धा यंदाही वाढतीच आहे.

राज्यातील महाविद्यालयांमधील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, कृषी अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल शनिवारी रात्री उशीरा जाहीर झाला. यंदा शंभर पर्सेटाईल म्हणेज सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी ग्राह्य़ धरण्यात येणाऱ्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम) या विषय गटाची परीक्षा देणाऱ्या २२ विद्यार्थ्यांना १०० पर्सेटाईल मिळाले आहेत. त्याशिवाय ८५ ते १०० पर्सेटाईल मिळवणारे २६ हजार ५०२ विद्यार्थी आहेत. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार असल्याचे दिसत आहे.
औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ग्राह्य़ धरण्यात येणाऱ्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) या विषय गटात सर्वोत्तम म्हणजे १०० पर्सेटाईल मिळवणारे १९ विद्यार्थी आहेत. त्यामुळे मुळातच गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांची मागणी वाढत असलेल्या या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची स्पर्धा यंदा वाढण्याची शक्यता आहे.

औषधनिर्माण प्रवेशस्पर्धा शिगेला

गेल्या काही वर्षांपासून औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमातील प्रवेशासाठीची स्पर्धा शिगेला पोहोचली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत एकूण पात्र विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली असली तरी साधारण २५ हजार जागांसाठी २ लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेशाच्या स्पर्धेत आहेत. त्यात ८५ पेक्षा अधिक पर्सेटाईल मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३२ हजार सातशे आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयांतील जागा यंदाही रिक्तच?

यंदा प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असली तरी त्यातील प्रत्यक्ष परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. गेल्या वर्षी राज्यातील साधारण ५६ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही जवळपास १ लाखांनी घटल्याचे दिसत आहे. अभिायांत्रिकी शाखेसाठी यंदा १ लाख ७४ हजार ६७९ विद्यार्थी बसले होते. राज्यात अभियांत्रिकीच्या साधारण १ लाख २० हजार जागा उपलब्ध आहेत. यंदा मुळातच प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू होत आहे. सध्या विद्यार्थ्यांनी इतर विषयांना प्रवेश घेतला आहे. जवळपास एका सत्राचा कालावधी प्रवेशोत्सुक विद्यार्थी दुसऱ्या विद्याशाखेतील शिक्षण घेत आहेत. त्याचा फटका महाविद्यालयांना बसण्याची शक्यता प्राचार्यानी व्यक्त केली. प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठी स्पर्धा असली तरी मधल्या फळीतील आणि तळातील महाविद्यालयांना यंदाही विद्यार्थी शोधावे लागणार असल्याचे दिसत आहे.