पसंतीचे महाविद्यालय मिळवण्यासाठी धडपड

अकरावीच्या प्रवेशफेऱ्या संपुष्टात येत असताना पसंतीचे महाविद्यालय मिळत नसल्याने संस्थास्तरावरील प्रवेशामध्ये सोमवारपासून मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मागील दोन दिवसांमध्ये ४४७ विद्यार्थ्यांनी संस्थास्तरावरील कोटय़ामधून प्रवेश निश्चित केले आहेत. नामांकित महाविद्यालयाच्या जागा भरल्यानंतर आता पसंतीचे महाविद्यालय अनेक पालक आणि विद्यार्थ्यांनी संस्थास्तरावरील प्रवेशाकडे मोर्चा वळविला आहे.

अकरावीच्या चार प्रवेश फेऱ्या, एक खास फेरी संपल्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश फेरी राबविण्यास सुरुवात झाली आहे. या फेरीतील ८० ते १०० गुण मिळवणाऱ्या पहिल्या गटाची प्रवेशफेरी सोमवारी पार पडली. या फेरीमध्ये नामांकित महाविद्यालयाच्या उरल्यासुरल्या जागाही फुल्ल झाल्या आहेत. तेव्हा आता पसंतीचे महाविद्यालय मिळवण्यासाठी अनेक पालक आणि विद्यार्थी संस्थास्तरावरील प्रवेशाकडे वळले आहेत.

सोमवार आणि मंगळवार या दोनच दिवसांमध्ये ४७७ विद्यार्थ्यांनी संस्थास्तरावरील कोटय़ामधून प्रवेश घेतले आहेत. यामध्ये व्यवस्थापनाच्या जागांवर सर्वात जास्त म्हणजे २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर त्याखालोखाल अल्पसंख्याक कोटय़ातून १३६ विद्यार्थ्यांनी आणि इनहाऊस कोटय़ातून १०७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.

नामांकित महाविद्यालयांना पसंती

‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ तत्त्वावर ८० ते १०० गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या पहिल्या गटाच्या फेरीमध्ये नामांकित महाविद्यालयाच्या उरल्यासुरल्या जागाही पूर्ण झाल्या आहेत. एस.के. सोमय्यामधील उरलेल्या कला शाखेच्या पाच आणि वाणिज्यच्या १५ जागा या फेरीत भरल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता या शाखांसाठी महाविद्यालयामध्ये जागाच शिल्लक राहिलेल्या नाहीत. तर रुपारेलमधील वाणिज्यच्या तीनही जागा भरल्या आहेत.