देशाचे भवितव्य घडविण्याची ताकद या युवा पिढीत आहे. त्यांची कुवत व ताकद लक्षात घ्यायला हवी. आत्ताच्या पिढीबद्दल गैरसमज निर्माण होत आहेत. परंतु त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे सांगतानाच महाविद्यालयीन निवडणुका बंद करून लोकशाहीमधील निवडणुकीची प्रक्रिया थांबवणे योग्य नाही. त्यामुळे या निवडणुका सरकारने पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी येथे केली.

मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिर येथे आयोजित केलेल्या ‘संवाद साहेबांशी’ या कार्यक्रमात पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. अमोल मातेले, महाविद्यालय प्राचार्य संघटनेचे टी. शिवारे यांच्यासह विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. लोकशाहीमध्ये लोकांना त्यांचा प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे. राजकारणात चुकीच्या व्यक्ती येतात, हे खरे आहे. पण त्यांना आवर घालण्यासाठी सर्वसामान्य माणसाने जागृत राहिले पाहिजे. जी चुकीची प्रवृत्ती आहे, ती बाजूला सारली तरच राजकारणात शुद्धता येईल. महाविद्यालय आणि विद्यापीठात आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना मिळायलाच हवा. त्यासाठी या निवडणुका पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली.

साचेबंद अभ्यासातून गुणात्मक बदल होत नाहीत. त्यामुळे अशा अभ्यासातून विद्याध्र्यानी बाहरे पडावे. तसेच काळानुरूप अभ्यासक्रमात बदल केले पाहिजेत. आव्हानाला तोंड देणारे अभ्यासक्रम तयार व्हावेत, मात्र त्यामध्ये नव्या-जुन्यांचा समन्वय असावा, असेही पवार म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांना टोला..

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर पीएचडी करणार असल्याचे वक्तव्य केले होते, त्याबाबत एका विद्यार्थिनीने प्रश्न विचारला असता, पदव्युत्तर शिक्षणानंतर पीएचडी तीन वर्षांनी करता येते. मात्र चंद्रकांत पाटील यांना माझ्यावर पीएचडी करायला दहा ते बारा वर्षे लागतील, असा टोला पवार यांनी लगावताच सभागृहात हशा पिकला.