पब्ज, महागडे मोबाईल, आणि मौजमजेसाठी चोरी करणाऱ्या दोन महाविद्यालयीन तरुणांना मंगळवारी मुंबई पोलिसांनी अटक केली. वांद्रे कुर्ला संकुल परिसरातील श्रीमंत अधिकाऱ्यांना लक्ष्य करून हे दोघे लुटत असत. यासंदर्भात  युनिट ८ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी सांगितले की, वांद्रे कुर्ला संकुलात श्रीमंत अधिकाऱ्यांची ये जा असते. अशा अधिकाऱ्यांना गाठून त्यांना लुटण्याच्या घटना मागील काही दिवसांत वाढल्या होत्या. नुकतीच सिटी बॅंकेचे एक उच्चपदस्थ अधिकारी रौनक तौष्नीवाल या भागात काही कामानिमित्त रात्रीच्या वेळी आले होते. दोन तरुणांनी अंधाराचा फायदा घेत त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील महागडे मोबाईल चोरले होते. त्या अनुषंगाने तपास करीत पोलीस निरीक्षक राजू कसबे आणि सहाय्यक  पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या पथकाने या भागात सापळा लावला होता. मंगळवारी या पथकाने आतिक अन्सारी (१९) आणि आयुष गवळी (१९) या दोघांना अटक केली. हे दोघे कुर्ला येथे राहणारे असून याच भागातील एका नामांकित महाविद्यालयात बारावीत शिकत होते. त्यांच्याकडून चोरलेले मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. त्यांना पबमध्ये जाण्याची, महागडे मोबाईल वापरण्याची आवड होती. मित्रांबरोबर मौजमजा करण्यासाठी त्यांना पैसे हवे होते. त्यासाठी ते चोरी करत होते, असे फटांगरे यांनी सांगितले.