महोत्सवांच्या आयोजनाबाबतही अनिश्चितता

महाविद्यालयातील सर्वात उत्साहाचा आणि आनंदाचा काळ म्हणजे आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आणि महोत्सव. परंतु यंदा या स्पर्धाच्या काळातच परीक्षा आल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. त्यात स्पर्धाकरिता परीक्षा चुकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याची सोय आता बंद झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धाकडे नाइलाजाने पाठ फिरवावी लागत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या संगणकाधारित मूल्यांकनाच्या गोंधळानंतर पदवी परीक्षांचे नियोजन चुकले. त्यामुळे दिवाळीपूर्वी आटोपणाऱ्या परीक्षा दिवाळीनंतर सुरू कराव्या लागल्या. याच काळात विद्यार्थ्यांच्या एकांकिका स्पर्धा, महाविद्यालयीन महोत्सव आणि राज्यस्तरीय विविध खेळांच्या स्पर्धा रंगत असतात. परंतु, अवकाळी परीक्षा आल्याने अनेक स्पर्धामध्ये सहभागी होण्याच्या संधीवर विद्यार्थ्यांना पाणी सोडावे लागत आहे. त्यात महोत्सवांचे आयोजन करण्याकरिता पुरेसे दिवस हातात नसल्याने तेही होणार की नाहीत याबाबत अनिश्चितता आहे.

पदवीच्या तृतीय वर्षांबरोबरच प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या परीक्षाही विद्यापीठाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार घ्याव्या लागत आहेत. मात्र विद्यापीठाचे या दोन्ही परीक्षांचे नियोजन गडबडल्याने सांस्कृतिक स्पर्धा, खेळ, महोत्सवाच्या काळांतच परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेला प्राधान्य देऊन या स्पर्धामध्ये इच्छा असूनही सहभागी होता येत नाही आहे.

‘राज्यस्तरीय स्पर्धाच्या तारखा परीक्षांसोबत असल्या की आमच्या फेरपरीक्षा महाविद्यालये घेत. त्यामुळे आमचा खेळ कधी परीक्षेमुळे थांबला नाही. मात्र यंदा परीक्षा विद्यापीठाकडून घेण्यात येत असल्याने फेरपरीक्षेची संधी नाही. तसेच या वेळेस परीक्षा लांबल्याने राज्यस्तरीय स्पर्धामध्ये खेळण्याची संधी सोडावी लागत आहे,’ अशा शब्दांत महाविद्यालयीन क्रिकेट खेळाडू युवराज शिंदे याने आपली अडचण मांडली.लांबलेल्या निकालामुळे यंदा परीक्षा उशिराने सुरू झाल्या आहेत. परीक्षांचा आणि स्पर्धाचा काळ एकाच वेळी आल्याने विद्यार्थ्यांची नक्कीच अडचण झाली आहे. दरवेळी आत्तापर्यंत परीक्षा संपून विद्यार्थी स्पर्धाच्या तयारीला लागलेले असतात. मात्र या वेळी विद्यार्थी परीक्षेमध्ये अडकल्याने त्यांना आंतरमहाविद्यलयीन स्पर्धामध्ये सहभागी होता आलेले नाही, असे मिठीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य राजपाल हांडे यांनी सांगितले.परीक्षा सुरू असतानाही विद्यार्थी एकांकिका स्पर्धाना जाण्याची तयारी ठेवून आहेत. मात्र त्यांच्या अभ्यासाचे नुकसान होऊ  नये, यासाठी आम्ही त्यांना परवानगी दिलेली नाही. विद्यार्थ्यांच्या उत्साहावर विरजण घालताना आम्हालाही वाईट वाटते. परंतु विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने विचार करणे अधिक गरजेचे आहे, असे एका महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुखांनी सांगितले.

बदललेल्या वेळापत्रकाचा फटका

निकाल उशिरा लागल्याने पुढचे प्रवेश अडकलेल्या आणि अनेक एकांकिका गाजविणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा आयएनटीसारख्या एकांकिका स्पर्धामध्ये सहभागी होता आलेले नाही. त्यात आता परीक्षा लांबल्याने उत्तुंग, जल्लोष यांसारख्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धानाही विद्यार्थ्यांना मुकावे लागणार आहे. यंदा परीक्षा संपल्यानंतर लगेचच महोत्सव असल्याने त्याच्या तयारीसाठीही विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळालेला नाही. परीक्षा सुरू असताना काल विद्यापीठाने पेपरांच्या तारखांमध्ये बदल केला. त्यामुळे मागील दोन महिने सराव करून एकांकिकेची तयारी केलेल्या विद्यार्थ्यांना त्या दिवशी परीक्षा आल्याने स्पर्धेला येता येणार नाही, अशी प्रतिक्रिया एकांकिका स्पर्धक स्वप्निल बारसकर याने दिली.