करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई शहरांतील महाविद्यालये सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आली नसली तरी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबारात सहभागी होण्याचे आग्रहाचे निमंत्रण मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी पाठवले आहे. मंत्र्यांचा कार्यक्रमाचा आग्रहही कायम आहे.

राज्यातील विविध ठिकाणची महाविद्यालये सुरू झाली तरी मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथील महाविद्यालये सुरू करण्यास पालिका प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सध्या मुंबई आणि परिसरातील महाविद्यालये बंदच आहेत. करोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे महाविद्यालये सुरू करण्यात आली नाहीत, असे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे. असे असताना उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबारास उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले आहे. विद्यार्थी, शिक्षकांकडे या निमंत्रणाची ध्वनिचित्रफीत पाठवली जात आहे.

‘करोनाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला असून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, संस्था यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्र्यांचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. मुंबई विद्यापीठ आणि एसएनडीटी विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी, संस्था यांच्या अडचणीवर मात कशी करता येईल यावर या कार्यक्रमात मार्ग काढला जाईल. त्यामुळे सर्वानी सहभागी व्हावे,’ असे आवाहन कुलगुरूंनी केले आहे.

सामंत यांच्या निधीतून खर्च

जनता दरबाराच्या व्यवस्थेची जबाबदारी विद्यापीठांवर सोपवण्यात आली होती. त्यानंतर या कार्यक्रमाचा खर्च कुणी करावा याबाबत प्रश्न उपस्थित झाले. जनता दरबारचा खर्च विद्यापीठांना करावा लागणार असल्याच्या मुद्दय़ावर अधिकार मंडळातील सदस्यांनी आक्षेप घेतला होता. विद्यापीठाच्या कारभारात हस्तक्षेप होत असल्याची तक्रारही कुलपतींकडे करण्यात आली होती. आता कार्यक्रमाचा खर्च विद्यापीठांवर लादण्यात येणार नसल्याचे स्पष्टीकरण उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. आमदार निधीतून खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. खर्चाबाबत युवासेनेच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनीही गुरुवारी विचारणा केली होती.