अकरावीत ‘ऑफलाइन’ प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान

ऑनलाइन नोंदणीशिवाय प्रवेश करू नये असे बजावूनही भरमसाठ रक्कम ‘डोनेशन’पोटी देऊन व्यवस्थापन, इनहाऊस, अल्पसंख्याक अशा संस्थास्तरावरील जागांवर ऑफलाइन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी-पालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. हे विद्यार्थी आता ऑनलाईनच्या विशेष फेऱ्यांमधून प्रवेश घेत आहेत. त्यासाठी आधीच्या महाविद्यालयातील प्रवेश रद्द करून गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रे विद्यार्थ्यांना परत मिळवावी लागणार आहेत. मात्र, प्रवेश रद्द करून देऊ पण, शुल्क आणि डोनेशनपोटी घेतलेली रक्कम परत देणार नाही, असे सांगत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची अडवणूक चालवली आहे.

अकरावीचे सर्व प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार असून ऑफलाइन प्रवेश करू नयेत अशी सूचना वारंवार शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांना व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आली होती. असे असूनही अनेक महाविद्यालयांनी डोनेशन घेऊन ऑफलाइन प्रवेश केले आहेत. यातील काही प्रवेशांचा तपशील त्यांनी ऑनलाइन सादर केला आहे तर काही प्रवेशांचा तपशील सादर केलेला नाही. पहिली प्रवेश फेरी पूर्ण झाल्यावर अनेक जागा रिक्त राहिल्यामुळे शिक्षण विभागाने विशेष फेऱ्या घेण्याचा निर्णय घेतला. या विशेष फेऱ्यांमध्ये ऑफलाइन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनीही अर्ज केला. यातील काही विद्यार्थ्यांना नव्या प्रक्रियेत त्यांनी पर्याय भरलेल्या महाविद्यालयाकाही प्रवेशांचा तपशील त्यांनी ऑनलाइन सादर केला आहे तर काही प्रवेशांचा तपशील सादर केलेला नाही. त प्रवेशही मिळाला. यानंतर जेव्हा प्रवेश रद्द करण्यासाठी ते ऑफलाइन प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयात गेले तेव्हा त्यांना महाविद्यालयांनी डोनेशन आणि शुल्काची रक्कम परत न देता प्रवेश रद्द करणे मान्य असेल तरच प्रवेश कागदपत्रे दिली जातील असे सूचित केले. प्रवेश निश्चितीसाठी दोनच दिवस असल्यामुळे अनेक पालकांनी ती अट मान्य करुन कागदपत्रे परत मिळवली व नवीन महाविद्यालयात प्रवेश मिळवला. या सर्व गोंधळात पालकांना २५ ते ५० हजारांचा फटका बसला आहे. याचबरोबर काही महाविद्यालयांनी डोनेशनची पावती देताना महाविद्यालयाच्या न्यासाची न देता वेगळय़ाच न्यासाची दिली आहे. यामुळे या पालकांना नेमकी ही रक्कम महाविद्यालयीन प्रवेशासाठी डोनेशन म्हणून भरली आहे हे सिद्ध करणे अवघड जाणार आहे.दरम्यान, प्रवेश रद्द करण्यासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा शुल्क परतावा करावा अशी सूचना सर्वच महाविद्यालयांना देण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली.