रसिका मुळय़े, ॠषिकेश मुळे

अर्थार्जनासाठीच्या उपक्रमांमुळे गर्दीत भर; गर्दीचे व्यवस्थापन करण्यात महाविद्यालयांना अपयश

मुंबई/ठाणे : महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात येणारे महाविद्यालयीन महोत्सवांचे होत असलेले बाजारीकरण आता बाधक ठरू लागले आहे. मोठमोठय़ा कंपन्यांचे प्रायोजकत्व मिळवणे, चित्रपटांच्या प्रदर्शनपूर्व प्रसिद्धीसारखे सशुल्क उपक्रम राबवणे अशा प्रकारांतून महाविद्यालयीन महोत्सव महाविद्यालयाबाहेरील विद्यार्थ्यांची गर्दी खेचत आहेत. मात्र, या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. पार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयाच्या महोत्सवात गुरुवारी घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने महोत्सवांतील बेशिस्तीवर बोट ठेवले आहे.

डिसेंबर, जानेवारी महिन्यांमध्ये बहुतांश महाविद्यालयांत उत्सवांचे आयोजन केले जाते. पूर्वी महाविद्यालयाच्या स्तरावर आटोपशीर स्नेहसंमेलने पार पडत. मात्र, आता त्याची जागा महोत्सवांनी घेतली आहे. मोठमोठय़ा कंपन्यांचे प्रायोजकत्व मिळत असल्याने करण्यात येणारा झगमगाट, नामांकित बॅण्डचे सादरीकरण, चित्रपटांच्या प्रदर्शनपूर्व प्रसिद्धीसाठी सिनेकलावंतांची उपस्थिती या गोष्टींमुळे हे महोत्सव अन्य महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्याही आकर्षणाचे केंद्र बनतात. साहजिकच महोत्सवाला प्रमाणापेक्षा अधिक गर्दी होते. या गर्दीचा अंदाज घेऊन जागेचे व्यवस्थापन करणे किंवा गर्दी होऊ नये म्हणून खबरदारी घेणे या दोन्ही गोष्टींबाबत पुरेशी काळजी घेण्यात येत नाही, असा आरोप विद्यार्थी संघटना करीत आहेत. ‘‘कंपन्यांचे प्रायोजकत्व घेताना महाविद्यालये त्यातून पैसा कमावतात. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाय योजण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. अग्निरोधक यंत्रणा, पुरेसे सुरक्षारक्षक, गर्दी येऊ-जाऊ शकेल असे प्रवेशमार्ग याची काळजी अनेकदा घेण्यात येत नसल्याचे दिसते,’’ असे विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य सुधाकर तांबोळी यांनी म्हटले.

विद्यार्थी संघटनांचा हा आरोप महाविद्यालय व्यवस्थापनाने मात्र फेटाळून लावला आहे. ‘‘काही वर्षांपूर्वी झेविअर्सच्या महोत्सवास झालेल्या गर्दीत काही गैरप्रकार घडले होते. तेव्हापासून महोत्सवात बॉलीवूडच्या कलाकारांना निमंत्रण देणे आणि चित्रपटांच्या प्रसिद्धीचे उपक्रम राबवणे बंद करण्यात आले,’’ असे झेविअर्स महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र शिंदे यांनी सांगितले. ‘‘गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही बाहेरील सुरक्षा यंत्रणा घेत नाही. सर्व व्यवस्थापन विद्यार्थीच पाहतात,’’ असे ते म्हणाले. रुईया महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनुश्री लोकूर यांनीही महोत्सवादरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली जात असल्याचा दावा केला. ‘‘आमच्या महाविद्यालयाच्या महोत्सवात महाविद्यालयीन ओळखपत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. महाविद्यालयाची सुरक्षाव्यवस्थाही चोख असते. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहते,’’ असे त्या म्हणाल्या.

ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या ‘गंधर्व’ आणि मुलुंडच्या वझे केळकर महाविद्यालयाच्या ‘डायमेन्शन’ महोत्सवात पोलिसांना पाचारण करण्याचा निर्णय त्या महाविद्यालयांनी घेतला आहे. तसेच राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना गर्दीच्या व्यवस्थापनासाठी प्रशिक्षण देण्यात येत असल्याचेही महाविद्यालयांतून सांगण्यात आले.

वांद्रय़ाच्या नॅशनल महाविद्यालयात सायंकाळी ७ नंतर महोत्सवांच्या आयोजनाला परवानगीच दिली जात नाही. ‘‘आमचे सभागृह ५७५ बैठकीचे आहे. त्यामुळे तितकेच पास विद्यार्थ्यांना देण्यात येतात. बाहेरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही. प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांसह शिक्षकही तैनात असतात,’’ असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश पंजवानी यांनी सांगितले.

मिठीबाईमध्ये काय घडले?

मिठीबाई महाविद्यालयात ‘कलोजियम’ हा महोत्सव होता. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी डिव्हाइन या रॅप बँडचा कार्यक्रम होता. महाविद्यालयाने त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवेशिका दिल्या. बँडकडूनही समाजमाध्यमांवर प्रसिद्धी करण्यात आली. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी झाली. जागा नसतानाही आत येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षारक्षकांनी अडविले. त्या वेळी चेंगराचेंगरी झाली व आठ विद्यार्थी जखमी झाले. कूपर रुग्णालयात विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले. जखमींमधील तीन विद्यार्थी मिठीबाई महाविद्यालयाचे होते, तर पाच विद्यार्थी बाहेरील होते. मिठीबाईच्या तीन विद्यार्थ्यांसह आणखी दोघांना उपचार करून गुरुवारी रात्री सोडून देण्यात आले. तीन विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.