आठवडय़ाची मुलाखत : कर्नल डॉ. जे. सी. खन्ना (सचिव, बाई साखराबाई  दिनशॉ पेटीट रुग्णालय )

चुकीची उपचार पद्धती किंवा चुकीचे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे दर महिन्याला ६० ते ७० प्राणी परळ येथील बलघोडा रुग्णालयात दाखल होतात. समाजात भूतदया वाढली असली तरी अज्ञानामुळे प्राणिमित्रांचे प्रेम प्राण्यांच्याच जिव्हारी लागत आहे. अज्ञानामुळे अनेकदा प्राण्यांना जीवही गमवावा लागतो. बहुतांश घरगुती उपचार केल्यानंतर गंभीर आजार झालेल्या प्राण्याला परळ येथील बलघोडा रुग्णालयात आणले जाते. प्रकृती गंभीर असलेल्या प्राण्यांच्या बचावासाठी आटोकाट प्रयत्न करणारे माजी लष्कर पशुवैद्यक व बलघोडा रुग्णालयाचे सचिव कर्नल के. सी. खन्ना यांच्याशी केलेही ही खास बातचीत.

* प्राणिप्रेमाचा प्राण्यांना त्रास कसा होतो?

गेल्या दहा वर्षांत प्राण्यांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांची संख्या वाढली आहे. अनेकदा रस्त्यावरील किंवा घरातील पाळीव प्राण्याला आजार झाल्यास या सामाजिक संस्थांतील सदस्य फोनवर मिळालेल्या माहितीवरून तात्पुरते उपचार करतात. यात प्राण्यांच्या आजाराचे निदान न करता उपचार केले जातात. या संस्थांकडे तपासणीसाठी लागणारी आवश्यक साधनसामग्री नसते. या संस्थांमध्ये प्राण्यांवर उपचार करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय शिक्षण घेतलेले किंवा पशुवैद्यक नसतात. भटक्या श्वानांना तर याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. अपघातात जखमी झालेल्या या भटक्या श्वानांच्या जखमेवर हळद लावली जाते. मात्र गंभीर जखमेवर हळद लावल्यास संसर्ग वाढण्याची किंवा जखम चिघळण्याची शक्यता असते. यातून ही जखम वाढते. हे प्राणिप्रेमींच्या लक्षात येत नाही. घरातील पाळीव प्राण्याला ताप आला तर त्याला वापरातील औषधे दिली जातात. यात प्राण्याचे वय, वजन, औषधाची अ‍ॅलर्जी लक्षातच घेतली जात नाही. तर आमच्याकडे उपचारासाठी आलेल्या एका श्वानाला त्याचा मालक फक्त फळेच खाऊ घालत असे. आहारात प्रथिने, कबरेदके या सर्व घटकांचा समावेश असणे आवश्यक असते. श्वानाला दररोज चांगले अन्न न देता फक्त फळेच दिली तर त्याचा परिणाम श्वानाच्या आरोग्यावर होणे साहजिक आहे.

* हे टाळण्यासाठी काय करायला हवे?

आपल्याकडे प्राण्यांची विक्री करतेवेळी त्यांच्या आरोग्याची माहिती दिली जात नाही. त्याचा आहार काय आणि किती असावा, उपचार, याबद्दलची माहिती करून घेणे आवश्यक आहे. प्राण्यांचा सांभाळ कसा करावा याबाबत काही लेखकांची पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. परळ येथील बॉम्बे वेटनरी महाविद्यालयात प्राण्यासंबंधित अभ्यासक्रम सुरू आहे. पाळीव प्राण्याची खरेदी करण्यापूर्वी हा अभ्यासक्रम केल्यास प्राण्यांची हेळसांड थांबवली जाऊ शकते. सामाजिक संस्थांमधील सदस्यांनी प्राण्यांवर उपचार करण्यापूर्वी हा अभ्यासक्रम केल्यास प्राण्यांचा सांभाळ कसा करावा याचे मूलभूत शिक्षण मिळू शकते. येथे प्रात्यक्षिक अभ्यासावर भर देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना सोईचे ठरेल. प्राण्यांसंबंधित क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणारे अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्या विद्यापीठात दाखल होऊ शकतात. दिल्लीजवळील बल्लवगड येथे अ‍ॅनिमल वेल्फेअर संस्थेने प्राण्यांसाठी असलेले विद्यापीठ सुरू केले आहे. येथे पदवी व पदवीयुक्तशिक्षण घेता येते.

* प्राण्यांचे कायदे अधिक सशक्त करण्याची आवश्यकता आहे?

नक्कीच. आपल्याकडे श्वान, मांजर या पाळीव प्राण्यांच्या खरेदी-विक्रीची नोंदणी करणे आवश्यक आहे.  उत्साहाच्या भरात किंवा भेट म्हणून आलेला श्वान, मांजर याला चुकीचा आहार किंवा औषधे दिली जातात. यामुळे ते प्राणी सतत आजारी पडतात. मात्र कालांतराने कंटाळून हे ग्राहक प्राण्यांना रस्त्यावर सोडून देतात किंवा एखाद्या संस्थेत दाखल करतात. अनेकदा प्रयोग म्हणूनही या प्राण्यांकडे पाहिले जाते. याचे ताजे उदाहरण म्हणजे वोडाफोन या जाहिरातीमध्ये झळकणारा पग जातीचा श्वान खूप प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे त्याची बाजारात खूप मागणी आहे. त्या तुलनेत पगची संख्या कमी असल्यामुळे काही व्यावसायिकांनी त्याचे इनब्रििडग (एकाच आईच्या पोटी जन्माला आलेल्या नर-मादी श्वानांमधील लैंगिक संबंध) सुरू केले. मात्र याचा परिणाम पगच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. अशा प्रकारे इनब्रििडगमधून जन्माला आलेले पग श्वानांना जन्मत: आरोग्याच्या समस्या असतात. इनब्रिडिंगमुळे त्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी होते आणि ते सतत आजारी पडतात. त्यामुळे व्यवसाय करणाऱ्यांना प्राण्यांची नोंदणी करणे अनिवार्य करावयास हवे. प्राण्यांच्या कायद्यात या बाबीचा समावेश करावे. याशिवाय प्राण्यांच्या सामाजिक संस्थांमध्ये पशुवैद्यकतज्ज्ञ असणे किंवा त्यासंबंधात शिक्षण घेणे आवश्यक करावयास हवे.

* प्राण्याच्या आरोग्याबाबत जनजागृतीसाठी काय केले जाते?

आमच्या रुग्णालयात दर आठवडय़ाला शाळेतील मुले भेट द्यायला येतात. या वेळी आम्ही त्यांना प्राण्यांची ओळख करून देतो आणि त्यांना कसे हाताळावे याचे शिक्षणही देतो. अनेकदा शाळांमध्ये जाऊनही प्राण्यांना हाताळण्याचे त्यांच्या आरोग्याचे मूलभूत शिक्षण दिले जाते. प्राण्यांवर गैरपद्धतीने होणारे उपचार रोखण्यासाठी प्राणिप्रेमींनी आणि घरी प्राणी पाळलेल्या कुटुंबांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यांनी प्राण्यांची प्रकृती समजून घेण्यासाठी प्रयत्न केले तर प्राण्यांचा अवाजवी छळ रोखता येऊ शकतो.

मुलाखत – मीनल गांगुर्डे