News Flash

शक्तिपरीक्षेची रंगीत तालीम

सुमारे दीड तासांच्या सुनावणीनंतर बहुमत सिद्ध कधी करायचे याचा निर्णय मंगळवारी सकाळी जाहीर होईल हे स्पष्ट झाले.

(संग्रहित छायाचित्र)

महाआघाडीच्या आमदारांना एकजुटीची शपथ; सत्तापेचाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आज निर्णय

राज्यातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालय मंगळवारी निर्णय देणार असताना शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने सोमवारी शक्तिपरीक्षेची रंगीत तालीम घेतली. या तिन्ही पक्षांनी १६२ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र राज्यपालांना सादर केले. त्यानंतर  आमदारांना सायंकाळी ग्रॅंड हयात या पंचतारांकित हॉटेलात एकजुटीची शपथ देण्यात आली.

सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत  काय निर्णय लागतो, याकडे सोमवारी साऱ्यांचे लक्ष लागले होते. सुमारे दीड तासांच्या सुनावणीनंतर बहुमत सिद्ध कधी करायचे याचा निर्णय मंगळवारी सकाळी जाहीर होईल हे स्पष्ट झाले. यामुळे फडणवीस सरकारला आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी आणखी २४ तासांचा अवधी मिळाला. विश्वासदर्शक ठरावावर एक-दोन दिवसांत मतदान होऊ शकते, याचा अंदाज आल्याने विधान भवन परिसरात अधिवेशनाची तयारी सुरू झाली. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासह छोटय़ा पक्षांच्या १६२ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील यांनी राजभवनात जाऊन सादर केले. या वेळी राज्यपाल नवी दिल्लीत होते, पण त्यांच्या सचिवालयाकडे हे पत्र देण्यात आले. १६२ आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे फडणवीस सरकार हे अल्पमतात असल्याचे सिद्ध होते, असे जयंत पाटील म्हणाले.

सायंकाळी आघाडीच्या नेत्यांची आणि आमदारांची संयुक्त बैठक पार पडली. शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण आदी नेत्यांची या वेळी भाषणे झाली आणि फडणवीस सरकारचा पराभव करण्याचा निर्धार करण्यात आला. १६२ आमदार एकत्र आहोत, असे शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरूच

अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सोमवारीही सुरूच होते. सकाळी विधान भवनात आलेल्या अजित पवार यांच्याशी छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील यांनी सुमारे तीन तास चर्चा केली. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस संयुक्त आघाडी सरकारमध्येही उपमुख्यमंत्री पदच मिळेल व अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मिळू शकते, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजितदादांना समजाविण्याचा प्रयत्न केला; पण अजितदादा ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते, असे सांगण्यात आले. चर्चेतून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.

हा पोरखेळ : शेलार

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हा कार्यक्रम म्हणजे एक पोरखेळ होता. ओळख परेड ही गर्दीतून आरोपी ओळख पटविण्यासाठी होते. जनतेतून निवडून आलेल्या आपल्या आमदारांचा अपमान केलाच, पण निवडून देणाऱ्या जनतेचाही अपमान करण्यात आला आहे.

आत्मविश्वास गमावल्यानंतर आत्मबळ मिळवण्याचा नेत्यांनी केलेला हा टुकार प्रयत्न आहे. आज १६२ आमदार असल्याचा कांगावा केला, पण विधानसभेचे १४५ तरी आमदार होते का? याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे आव्हान भाजप नेते आशीष शेलार यांनी दिले. आज महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाने शरमेने मान खाली घालावी असा एक प्रसंग देशाने पाहिला आणि तो म्हणजे वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आमदार आदित्य ठाकरे यांनी चक्क सोनिया गांधी यांचे नेतृत्व मान्य केल्याची शपथ घेतली. सत्तेसाठी शिवसेना काय करू शकते हे देशाने पाहिले आणि शिवसेनेचे बेगडी हिंदुत्वही समोर आले आहे. फोटो तुमचा, फोटोग्राफर तुमचा, पण बहुमताच्या शर्यतीत फोटोफिनिश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारच करणार, असे शेलार म्हणाले.

अजित पवारांना पक्षादेशाचा अधिकार नाही : शरद पवार

अजित पवारांचा आदेश न मानल्यास अपात्रतेची कारवाई होईल, अशी भीती नवीन आमदारांना दाखवली जात आहे. पण ते चुकीचे आहे. राष्ट्रवादीने अजित पवार यांना गटनेतेपदावरून दूर केले आहे. त्यामुळे आता अजित पवार यांना पक्षादेश काढण्याचा अधिकारच उरलेला नाही, असे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. अजित पवार यांनी पक्षादेश काढलाच तर त्यांच्याविरोधात मतदान करणाऱ्यांवर कसलीही कारवाई होणार नाही, अशी ग्वाही  पवार यांनी  दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 3:54 am

Web Title: color training of strength tests akp 94
Next Stories
1 राज्यात कांद्याची  विक्रमी दरझेप
2 मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा मंत्रालयात
3 रेल्वे प्रवाशांनाही ‘ई-दंड’?
Just Now!
X