बोगस मतदानाला पायबंद घालण्यासाठी उपाययोजना

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या मतदार यादीतील मतदाराच्या नावापुढे त्याचे रंगीत छायाचित्र असणार आहे, त्यामुळे बोगस मतदानाला आळा बसेल, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अशा प्रकारे शंभर टक्के मतदारांची रंगीत छायाचित्रे असलेल्या मतदार यादीनुसार आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सध्या मतदान ओळखपत्रावर मतदाराचे छायचित्र असते, परंतु सर्वच ठिकाणी मतदार यादीतील मतदाराच्या नावापुढे त्याचे छायाचित्र नसते. आता शंभर टक्के मतदार याद्यांमध्ये मतदारांची रंगीत छायाचित्रे असणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावत करण्यात आल्या. ३१ जानेवारी २०१९ रोजी राज्यातील मतदारांची अंतिम यादी प्रकाशित करण्यात आली. त्यानुसार राज्यात ८ कोटी ७३ लाख ३० हजार ४८४ मतदार आहेत.

मतदार असलेल्या व मतदार नसलेल्या नागरिकांच्या माहितीसाठी व्हीव्हीआयपी हा एक कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार जे मतदार आहेत, त्यांना मतदार यादीतील आपल्या नावाची पडताळणी करून घेण्यासाठी १९५० ही टोल फ्री हेल्प लाइन सुरू करण्यात आली आहे.  जे मतदार नाहीत, त्यांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरून नमुना-६ फार्म डाऊनलोड करून तो पूर्ण भरून मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्र (बूथ) अधिकारी यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले.

मेधा गाडगीळ यांची सात दिवसांत दुसऱ्यांदा बदली

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अखिल भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू केले आहे. अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांची सात दिवसांत दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. त्यांची पुन्हा मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय अन्य तीन अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या करण्यात आल्या आहेत.

गेल्याच आठवडय़ात दोन दिवसांत २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्या वेळी मदत व पुनर्वसन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांची मंत्रालयाबाहेर महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाच्या व्यवस्थापकीय महासंचालकपदी बदली करण्यात आली होती. सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव बिपिन मलिक यांची वित्तीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली. विकास आयुक्त (असंघटित कामगार) पंकज कुमार यांची बदली करून त्यांची  रुसाचे प्रकल्प संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे अतिरिक्त निवासी आयुक्त असलेल्या समीर सहाय यांना तेथेच निवासी आयुक्त म्हणून बढती देण्यात आली.