उपनगरीय स्थानक व टर्मिनसवर तपासणी

विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी रेल्वेतून रोख रकमेसह अन्य वस्तूंची वाहतूक केली जाण्याची शक्यता आहे. त्याला आळा बसावा यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलाने ‘कोम्बिंग ऑपरेशन’ सुरू केले आहे. यासाठी विशेष पथक तैनात केल्याची माहिती सुरक्षा दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी रोख रक्कम, दारू व अन्य वस्तूंचीही देवाणघेवाण होण्याची शक्यता असते. त्यासाठी लोकल किंवा मेल-एक्स्प्रेसमधून त्याची प्रवाशांमार्फत वाहतूक होऊ शकते. त्याला आळा बसावा यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने ही कारवाई सुरू केली आहे.

यासाठी विशेष पथक नेमण्यात आल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सकाळी पाच आणि रात्रीच्या तपासणीसाठी दहा जवान या पथकात आहेत. त्यांच्याकडून फलाट व लोकलमधील संशयित प्रवाशाकडील सामान तपासले जात आहे. या पथकासोबत डॉग्ज स्क्वॉडही आहे. सकाळी सात ते आठ लोकल व मेल-एक्स्प्रेस व रात्री पाच ते सहा लोकल व मेल-एक्स्प्रेस गाडय़ा त्यांच्याकडून तपासणी केली जात आहे. याशिवाय सुरक्षा दलाच्या अन्य जवानांनाही तपासणीचे आदेश दिले आहेत.