प्राध्यापकांच्या संपाने विद्यार्थ्यांचे तर डॉक्टरांच्या संपामुळे सर्वसामान्य गोरगरीबांचे हाल होत असल्याने हे दोन्ही संप मिटविण्याकरिता पुढाकार घ्यावा, असा सल्ला प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिला आहे.
प्राध्यापकांचा संप गेले दोन महिने सुरू आहे. उत्तरपत्रिका तपासणे किंवा परीक्षांवर त्याचा परिणाम होत आहे. लोकशाहीत आंदोलन वा संप करण्याचा सर्वानाच अधिकार असतो. पण किती ताणायचे याचाही विचार झाला पाहिजे. प्राध्यापकांच्या मागण्यांवर सरकारनेही सकारात्मक भूमिका घेऊन संप लवकारत लवकर मिटेल या दृष्टीने पाऊले टाकावीत, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना उद्देशून दिला.  प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्यामागे मुख्यमंत्री विरुद्ध प्रदेशाध्यक्ष यांच्यातील वादाची किनार असल्याचे बोलले जाते.
दुष्काळग्रस्तांच्या मदतीकरिता राज्यातील काँग्रेसचे सर्व लोकप्रतिनिधी त्यांचे भत्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार आहेत. येत्या ६ मे रोजी धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला जाणार आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्ह्य़ांचा ठाकरे हे मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात दौरा करणार आहेत.
 राष्ट्रवादीचेच नुकसान
राष्ट्रवादीच्या विविध मंत्र्यांवर होणारे आरोप किंवा बेताल वक्तव्ये यामुळे सरकारच्या प्रतिमेला धक्का बसत असला तरी त्यातून काँग्रेसचे नुकसान होत नाही. याउलट राष्ट्रवादीचेच जास्त नुकसान झाले असावे, अशी टिप्पणी ठाकरे यांनी केली. आघाडीच्या सरकारमुळे काम करताना मर्यादा येतात, असे वक्तव्य मुख्यमंत्री चव्हाण यांनी केले असले तरी आघाडी कायम ठेवायची की नाही याबाबतचा निर्णय हा नवी दिल्लीत होईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मर्यादेत राहूनच आघाडीचा धर्म पाळावा, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून दिला.

खासगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या पालिका डॉक्टरांवर कारवाई
कामाचे तास पूर्ण न करताच पालिका रुग्णालयांतून पळ काढून खासगी रुग्णालयांत काम करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमधील डॉक्टरांना कामाचे तास पूर्ण केल्यानंतरच खासगी रुग्णालयांमध्ये काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र केईएम, नायर, लोकमान्य टिळक रुग्णालयांतील तज्ज्ञ डक्टर पालिकेतील काम अर्धवट सोडून खासगी रुग्णालयांमध्ये जात असल्याचे आढळून आले आहे. या प्रकाची गंभीर दखल घेत अशा डॉक्टरांची यादी सादर करण्याचे आदेश पालिका रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांना देण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी सांगितले.