प्रत्येकाने पुढे येऊन बोललं पाहिजे, ही काळाची गरज आहे असं वक्तव्य लेखिका नयनतारा सहगल यांनी मुंबईत केलं. मुंबईत त्यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्या बोलत होत्या. मौन बाळगून काहीही होणार नाही प्रत्येकानं या कठीण काळात बोललंच पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. यासाठी त्यांनी एका गाण्याचंही उदाहरण दिलं. गाणं किती परिणाम साधू शकतं याचं उदाहरण सहगल यांनी दिलं. नया संसार या सिनेमातील गाण्याच्या ओळी काय होत्या ते नयनतारा सहगल यांनी सांगितलं. ‘एक नया संसार बनाये, एक नया संसार, ऐसा इक संसार की जिसमें धरती हो आझाद, की जिसमे जीवन हो आझाद, की जिसमे भारत हो आझाद, जनताका हो राज जगतमें, जनता की सरकार’ या शब्द सेन्सॉरनेही त्याकाळी पास केले होते. मी लहान असताना हे गाणे ऐकले आणि या शब्दांचा माझ्यावर खूप सखोल परिणाम झाला असं सहगल यांनी म्हटलं आहे.

सध्याचा काळ कठीण आहे, अशा कठीण काळात एक मोठी शांतता हिंदी सिनेसृष्टीत पसरली आहे. कोणताही कलाकार मात्र शांत आहेत, सगळेच शांत आहेत असं नाही. आनंद पटवर्धन यांनी त्यांना मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार परत केला होता. बाकी अनेक कलाकार शांत आहेत याची खंत वाटते असंही नयनतारा सहगल यांनी म्हटलं आहे. देहरादूनमध्ये असताना मी एका कलाकाराची खंत ऐकली तो कलाकार म्हणजे नसीरुद्दीन शाह. शाह यांनी मांडलेल्या भावना योग्य होत्या, त्यांनी मांडलेली खंत ही फक्त त्यांच्या मुलांपुरती मर्यादित नव्हती तर प्रत्येक मुस्लिम बांधवासाठी मांडलेली खंत होती. रोज आपल्या देशातील रस्त्यांवर निष्पाप लोकांना ठार केलं जातं आहे, कारण ते मुस्लिम आहेत. दररोज निष्पाप लोकांना अटक होते आहे ही स्थिती मला बघवत नाही. मी जेव्हा नसीरुद्दीन शाह यांची भूमिका आणि म्हणणे ऐकले तेव्हा मला हेच वाटले की त्यांच्या बाजूने एकही बडा कलाकार बोलण्यास का उभा राहिला नाही? असा प्रश्न मला पडल्याचेही नयनतारा म्हटल्या. आपण सगळे हिंदू नसलो तरीही हिंदुस्थानियत सोडू नका असेही आवाहन यावेळी नयनतारा सहगल यांनी केले.

यवतमाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे निमंत्रण नयनतारा सहगल यांना देण्यात आले मात्र मनसेच्या इशाऱ्यानंतर ते मागे घेण्यात आले. मनसेने त्यांची भूमिकाही सोडली असली तरीही नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण मागे घेण्यात आले. यावरून साहित्यसंमेलनातही चांगलीच टीका झाली. नयनतारा सहगल यांचा अपमान झाल्याची खंत व्यक्त झाली. ज्यानंतर या गोष्टीचा खेद व्यक्त करत चला एकत्र येऊ या अशी हाक देत शिवाजी मंदिर या ठिकाणी एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं त्याला नयनतारा सहगल उपस्थित होत्या. याच कार्यक्रमात त्यांनी त्यांची परखड मतं मांडली.