वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन
वर्षभरापूर्वी ‘मेक इन इंडिया’ मोहिम सुरू झाल्यानंतर उद्योगांसाठी सरकारी कारभाराची लाल फितीतील प्रतिमा आता उद्योगांचे स्वागत करणाऱ्या लाल गालिच्यांमध्ये परिवर्तित झाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व व्यापार मंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘मेक इन इंडिया सप्ताहा’च्या उद्घाटन समारंभात केले.
२०१५ मध्ये देशातील थेट विदेशी गुंतवणूक प्रमाणात ४८ टक्के वाढ झाल्याचे नमूद करून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा ही सरकारच्या व्यवसायपूरक वातावरणामुळेच सुधारत असल्याचा दावाही त्यांनी केला.
देशाच्या अर्थव्यवस्थेत निर्मिती क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण असून २०२२ पर्यंत भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात या क्षेत्राचा वाटा सध्याच्या १२ टक्क्यांवरून थेट २५ टक्क्यांवर जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सिस्को, यूएसआयडीईओच्या प्रतिनिधींनी यावेळी ‘मेक इन इंडिया’बद्दलची मते मांडली. तर ‘भारतीय औद्योगिक महासंघा’चे (सीआयआय) अध्यक्ष सुमित मझुमदार यांनी ‘मेक इन इंडिया’ ही मोहीम उद्योग क्षेत्रात क्रांतीकारक ठरेल, अशा शब्दांत देशाचे स्थान गेल्या दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत खूपच सुधारल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी ‘केपीएमजी’ने तयार केलेल्या भारताविषयीच्या उद्योग, व्यवसाय क्षेत्रावर प्रकाश टाकणाऱ्या अहवालांचे प्रकाशन करण्यात आले. तर निर्मिती, नाविन्य व नवउद्यमी क्षेत्रातील ‘टाइम
इंडिया’ पुरस्काराचे यावेळी वितरण करण्यात आले.