07 April 2020

News Flash

व्यावसायिक इमारती अपंगस्नेहीच हव्यात!

अन्यथा अधिवास प्रमाणपत्र न देण्याचे न्यायालयाचे पालिकेला आदेश

(संग्रहित छायाचित्र)

व्यावसायिक इमारती या अपंगस्नेही असल्याच पाहिजेत, असे स्पष्ट करत मुंबईत उभ्या राहणाऱ्या व्यावसायिक इमारतींमध्ये अपंगांसाठीच्या सुविधा आहेत की नाहीत याची खात्री पटल्यानंतरच अशा इमारतींना अधिवास दाखला देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी पालिकेला दिले.

मुंबईतील बहुतांश महत्त्वाच्या इमारतींमध्ये अपंगांसाठीच्या सुविधा उपलब्ध नसतात. परिणामी या इमारतींमध्ये जाण्यासाठी अपंगांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते ही बाब निशा जामवाल आणि अ‍ॅड्. आभा सिंह यांनी जनहित याचिकेद्वारे न्यायालयासमोर आणली आहे. तसेच या इमारतींमध्ये अपंगांसाठीच्या सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश द्या, अशी मागणी केली आहे.

बुधवारी या याचिकेवर झालेल्या सुनावणीच्या वेळी दक्षिण आणि मध्य मुंबईतील अपंगांसाठीच्या सुविधा नसलेल्या १५ इमारतींची यादी अ‍ॅड्. सिंह यांनी न्यायालयात सादर केली. यात नरिमन पॉइंट येथील ओबेरॉय हॉटेल, द फोर सिझन हॉटेल, नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट यांच्यासह काही सिनेमागृहे तसेच मॉल्सचा समावेश आहे.

मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठानेही याचिकेत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्दय़ाची गंभीर दखल घेतली. त्याचप्रमाणे बहुतांश व्यावसायिक इमारतींमध्ये अपंगासाठी विशेष सुविधा उपलब्ध केल्या जात नसल्याबाबत तीव्र नाराजी

व्यक्त केली. एवढेच नव्हे, तर पालिकेने अशा व्यावसायिक इमारतींना परवानगी देताना त्यात अपंगासाठीच्या सुविधा आहेत की नाहीत याची खातरजमा करावी. किंबहुना या सुविधा व्यावसायिक इमारतींमध्ये उपलब्ध करणे बंधनकारक करावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

अहवाल सादर करण्याचे आदेश

व्यावसायिक इमारतींना अधिवास प्रमाणपत्र देताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आधी इमारतीची पाहणी करावी आणि अपंगांसाठी इमारतीत सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत की नाहीत याची खातरजमा करावी, असे न्यायालायने म्हटले. त्याचवेळी अ‍ॅड्. सिंह यांनी ज्या १५ इमारतींची यादी सादर केली, त्यांची पाहणी करण्याचे आणि त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2019 1:28 am

Web Title: commercial buildings must be handicapped abn 97
Next Stories
1 ‘लोकसत्ता अ‍ॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’ – शाश्वत शेतीच्या विविध मार्गावर चर्चा
2 दहीहंडी निमित्त मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर
3 POLL : राज ठाकरेंची ईडी चौकशी सुडबुद्धीतूनच!
Just Now!
X