जुन्या नोटा स्वीकारण्याच्या नावाखाली ५००, हजार रुपयांच्या खरेदीची सक्ती

पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटांना कागदी तुकडय़ांचे मोल येणार हे पंतप्रधानांनी गेल्या आठवडय़ात जाहीर केल्यानंतर सर्वसामान्यांबरोबरच व्यापारी वर्गही भांबावून गेला. परंतु, गेल्या पाच-सहा दिवसात व्यापारी वर्ग या धक्क्यातून चांगलाच सावरला असून जुन्या नोटा स्वीकारण्याच्या नावाखाली ग्राहकांची लूट करण्याचे बनियेगिरी अनेकांनी शोधून काढली आहे. ग्राहकाला ५००, १००० रुपयांच्या खरेदीची सक्ती, जुन्या नोटा असल्यास चढय़ा दरांची आकारणी, कुठे सुटे देण्याच्या नावाखाली कमिशन घेणे असे प्रकार सुरू झाले आहेत.

चलनातून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद केल्यानंतर हाती शिल्लक असलेल्या चार दिडक्या जपून खर्च करणाऱ्या मुंबईकरांनी अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्याचे बंधन स्वत:ला घातले. ग्राहकांअभावी दुकानांमध्ये शुकशुकाट वाढू लागला. परंतु अनेक ठिकाणी व्यापारी मंडळी ५०० व १०००च्या नोटा स्वीकारत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, बहुतेक ठिकाणी जेवढय़ा रकमेची नोट असेल, तेवढय़ा रकमेची खरेदी करण्याची सक्ती ग्राहकाला करण्यात येत आहे. काही ठिकाणी बाद नोटा घेतानाच ग्राहकाला सुटे पैसे देण्याऐवजी तेवढी रक्कम त्याच्या खात्यावर जमा करून त्याने पुन्हा खरेदीला यावे, अशी शक्कलदेखील लढवली जात आहे. सर्वसामान्य नागरिकदेखील नोटा बाद होण्याच्या भीतीने दुकानदारांच्या या अडवणुकीला शरण जात असल्याचे दिसून येत आहे.

नालासोपारामधील कपडय़ांच्या दुकानदारांनी तर वेगळीच शक्कल लढविली आहे. एरवी ड्रेस किंवा साडीच्या खरेदीनंतर ग्राहकांच्या मागणीवरून किंमत कमी करणाऱ्या दुकानदारांनी पाचशे किंवा हजारांच्या नोटा आणणाऱ्यांना ही सवलत देणेच नाकारले आहे. पुतणीच्या लग्नानिमित्त येथे साडी खरेदीकरिता आलेल्या वीणा देसाई यांनी १६०० रुपयांची साडी पसंत केली. १६०० रुपयांची साडी दुकानदार १००० रुपयांना द्यायला तयार होता. मात्र, सगळ्या नोटा १००च्या द्याव्या, अशी त्याची अट होती. अन्यथा १०००-५००च्या नोटांच्या मोबदल्यात साडी हवी असेल तर १६०० रुपयांनाच देऊ, असे दुकानदाराचे म्हणणे होते. ‘परंतु, १००च्या पुरेशा नोटा नसल्याने आम्हाला साडी खरेदी न करताच परतावे लागले,’ असे देसाई  म्हणाल्या.

बांधकाम कामगारांना नवे काम

मुंबईतील अनेक ठिकाणी पुनर्विकासाच्या प्रकल्पांची कामे विविध कारणांमुळे बंद आहेत. बांधकाम करणाऱ्या कामगारांना आपल्या उदरनिर्वाहासाठी अन्य ठिकाणी कामे शोधावी लागत आहेत. नोटाबंदीचा निर्णय जाहीर होताच बँकांबाहेर रांग लावण्याचे नवे काम कामगारांना मिळू लागले आहे. रांगेतील नंबर जवळ आल्याचे कामगाराने कळविल्यानंतर संबंधित व्यक्ती पैसे घेऊन बँक गाठत आहेत. नोटाबंदीमुळे कामगारांना मात्र नवे काम मिळू लागले आहे. कांदिवलीत ३०० रुपयांच्या मोबदल्यात अनेक कामगार इतरांकरिता एटीएम आणि बँकांबाहेर रांगा लावण्याचे काम करीत आहेत.

कामगार मंडळींना दक्षिणा

५००-१००० रुपयांची नोट घेऊन येणाऱ्या ग्राहकांची संख्या हळूहळू वाढू लागल्यामुळे जमा होणाऱ्या नोटांचा प्रश्न या दुकानदारांना भेडसावू लागला आहे. परंतु दुकानातील कामगार, एरवी मालाची चढ-उतार करणारे हमाल, मालाची ने-आण करणारे हातगाडीवाले आदींना थोडेफार पैसे देऊन ५००-१००० रुपयांच्या नोटा बँकेत भरण्यासाठी दुकानदार पाठवू लागले आहेत. दुकानात काम करण्यासाठी मिळणार पगार आणि बँकेबाहेर रांगेत उभे राहण्यासाठी मिळणारी दक्षिणा यामुळे कामगार मंडळीही सध्या खुशीत आहेत. मात्र ही रक्कम बँकेतील एकाच खात्यावर भरली जाऊ नये याचीही दुकानदार काळजी घेत असून आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्याचा त्यासाठी वापर करीत आहेत.