मुंबईतील औद्योगिक-व्यापारी आस्थापने कार्यालय थाटण्यासाठी दक्षिण मुंबईपेक्षा वांद्रे-कुर्ला संकुलाला अधिक पसंती देत असल्याने आता या संकुलातील कार्यालयीन जागेचे सरासरी भाडेशुल्कही वाढले असून नरिमन पॉइंटला मागे टाकत आता वांद्रे-कुर्ला संकुलाने मुंबईतील सर्वात महाग परिसराचा मान पटकावला आहे.
नरिमन पाइॅंट येथील कार्यालयीन जागेसाठी जून २०१३ पर्यंत २४३ प्रति चौरस फूट असा सरासरी दर होता. तो आता तीन रुपयांनी कमी होऊन २४० रुपये प्रति चौरस फूटवर आला आहे. तर वांद्रे-कुर्ला संकुलातील भाडेशुल्काचा सरासरी दर आजमितीस प्रति चौरस फूट २९० रुपयांवर पोहोचला आहे. ऑक्टोबर ते आता संपत आलेल्या डिसेंबर २०१३ या तिमाहीतील हा बदल मुंबईतील व्यापारी केंद्राच्या स्थलांतराची कथा सांगणारा आहे.
येत्या वर्षभरात वांद्रे कुर्ला संकुलातील सरासरी दर ३०० रुपये प्रति चौरस फुटांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. तर नरिमन पॉइंटचा दर २४० रुपयांवरच स्थिर राहण्याची चिन्हे आहेत. अर्थात ही सरासरी दरांमधील तफावत आहे.
नरिमन पॉइंट येथील एक्स्प्रेस टॉवर, मेकर चेंबरसारख्या काही मोजक्या इमारतींमध्ये सरासरीपेक्षा अधिक दराने काहीवेळा वांद्रे-कुर्ला संकुलातील सरासरी दरापेक्षाही अधिक दराने कार्यालयांसाठी जागा घेण्यास औद्योगिक-व्यापारी आस्थापनांची तयारी दर्शवत आहेत, असे ‘जोन्स लांग ला सेल’ या मालमत्ता क्षेत्रातील संस्थेचे संशोधन विभागप्रमुख आशुतोष लिमये यांनी सांगितले.
नरिमन पॉइंट परिसरात आधुनिक काळात लागणाऱ्या मोठय़ा क्षेत्राचा अभाव, मुंबईच्या एका टोकाला असल्याने दळणवळणात होणारी गैरसोय अशा कारणांमुळे नरिमन पॉइंटचे महत्त्व कमी होत असल्याचे दिसून आले आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. वांद्रे, कुर्ला, कलिना भागात भाडेशुल्काचा सरासरी दर २३१ रुपये प्रति चौरस फूट असल्याचेही गेल्या काही महिन्यांत आढळून आले.
नरिमन पॉइंट येथे वाहनतळाचा प्रश्न मोठा आहे. तसेच आजच्या काळात आस्थापनांना एकाच ठिकाणी मोठी जागा हवी असते. हे दोन्ही प्रश्न वांद्रे-कुर्ला संकुलात सुटतात. तेथील इमारतींमध्ये प्रचंड मोठे क्षेत्र एकाच ठिकाणी उपलब्ध होते व मोठे कार्यालय थाटता येते. त्याचबरोबर वाहनांसाठीही जागेची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर कार्यालयात काम करण्यास येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रवासात जास्त वेळ जात असेल आणि दगदग होत असेल तर उत्पादकतेवर परिणाम होतो, असे लिमये यांनी स्पष्ट केले.

“नरिमन पॉइंटला येणारे कर्मचारी हे उपनगरातच राहणारे असतात. त्यांना दक्षिण मुंबईत येण्यापेक्षा वांद्रे-कुर्ला संकुल सोयीचे पडते. त्यामुळेही बडय़ा कंपन्या वांद्रे-कुर्ला संकुलाकडे जात आहेत. तसेच हा परिसर विमानतळाला जवळचा आहे हेही महत्त्वाचे ठरते.”
आशुतोष लिमये, जोन्स लांग ला सेल’ संस्थेचे संशोधन विभागप्रमुख