सायन-पनवेल मार्गावर कामोठेजवळ नव्याने सुरू करण्यात आलेल्या टोलवसुलीतून पनवेल तालुक्यातील सर्व वाहनांना वगळण्यात यावे, या मागणीचा अभ्यास करून त्यावर मार्ग काढण्यासाठी शासनाने एक समिती नेमली आहे. एक महिन्यात समितीला आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
कामोठय़ाजवळील या टोलनाक्याला पहिल्यापासूनच स्थानिकांचा विरोध होता. त्याविरोधात आंदोलनेही झाली. त्यामुळे बरेच महिने टोलवसुलीला सुरुवात करण्याचे थांबविण्यात आले होते, मात्र ६ जानेवारीपासून टोलवसुली सुरू करण्यात आली. त्या वेळीही मोठे आंदोलन झाले. स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन कळंबोली, पनवेल, कामोठे, कोपरा व खारघर या पाच गावांतील वाहनांना व एसटी गाडय़ांना टोलवसुलीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता शांतता असली तरी पनवेल तालुक्यातील सर्व गावे व शहर वसाहतीतील वाहनांना टोलमधून सूट द्यावी, अशी मागणी पुढे आली
आहे.
यासंदर्भात राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. त्यात मंबई बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता, खासगी सहभागातून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांचे तज्ज्ञ अजय सक्सेना, सायन-पनवेल टोलवेज कंपनीचे प्रतिनिधी व बहुमजली इमारत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचा समावेश आहे. एक महिन्याच्या आत समिती शासनाला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर टोलमधून सूट देण्याबाबत अंतिम निर्णय केला जाणार आहे.