रस्ते घोटाळ्याबाबत सादर करण्यात आलेला दुसरा अहवालही आयुक्त अजोय मेहता यांनी स्वीकारला असून आणखी दोन अभियंत्यांना बडतर्फ तर आणखी १६ जणांची पदावनती करण्यात आली. त्यामुळे २३४ रस्त्यांच्या दोन्ही चौकशी अहवालात आतापर्यंत बडतर्फ झालेल्या अभियंत्यांची संख्या सहा, तर पदावनती करण्यात आलेल्या अभियंत्यांची संख्या २३ वर गेली आहे. दुसऱ्या अहवालात सामाईक अभियंत्यांना दोन्हीपैकी जास्त असलेली शिक्षा देण्यात आली आहे.

रस्ते घोटाळ्याचा ३४ रस्त्यांचा पहिला अहवाल जानेवारीत देण्यात आला होता. त्यात चौकशी करण्यात आलेल्या १०० पैकी ९६ अभियंत्यांना शिक्षा देण्यात आली होती. २०० रस्त्यांच्या दुसऱ्या अहवालात १६९ अभियंत्यांची चौकशी करण्यात आली. यातील ८४ अभियंते हे चौकशी अहवालाच्या पहिल्या टप्प्यातही होते. या ८४ शिवाय इतर ८५ अभियंत्यांची चौकशी करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील १६ अभियंते दुसऱ्या टप्प्यात नव्हते, परिणामी एकूण २३४ रस्तेप्रकरणी १८५ अभियंत्यांची चौकशी झाली. या १८५ पैकी १८० अभियंते दोषी आढळले असून पाच जणांना निर्दोष जाहीर करण्यात आले. विशेष अभियांत्रिकीचे उपायुक्त रमेश बांबळे व प्रमुख चौकशी अधिकारी राजेंद्र रेळेकर यांनी हे अहवाल तयार केले. हा अहवाल महापालिकेच्या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध करण्यात येणार आहे.

रस्ते घोटाळ्यातील दोन्ही अहवालात एकसमान दोष आढळलेल्या अभियंत्यांच्या शिक्षेत वाढ न करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.

रस्ते घोटाळा घटनाक्रम

* ऑक्टोबर २०१५ चौकशी समिती नेमल्यानंतर अडीच वर्षांनी रस्ते चौकशी अहवाल सादर.

* पहिल्या टप्प्यात ३४ रस्त्यांच्या ३५२ कोटी रुपयांच्या रस्त्यांमध्ये ३५ ते १०० टक्के कामात अनियमितता आढळली.

* रस्ते चौकशीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर ९५९ कोटी रुपयांच्या आणखी २०० रस्त्यांचा अहवाल करण्यात आला.

* रस्ते विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता अशोक पवार आणि दक्षता विभागाचे मुख्य अभियंता उदय मुरुडकर आणि के. आर. कन्स्ट्रक्शन, महावीर इन्फ्रा आरपीएस शाह, आर. के. मदानी, जे. कुमार व रेलकॉन या रस्ते कंत्राटदारांविरोधात पोलिसात तक्रार. सर्व जण जामिनावर मुक्त.

* जानेवारी ६ रोजी पहिला रस्ते घोटाळा अहवालात ९६ अभियंत्यांवर दोष निश्चित.

* फेब्रुवारी २३ रोजी आणखी ८३ अभियंत्यांवर दोष निश्चित.

 

चौकशी अहवाल

२०० रस्त्यांच्या चौकशीत या ८४ शिवाय ८५ नवीन अभियंत्यांची चौकशी. पहिल्या टप्प्यातील १६ अभियंते दुसऱ्या टप्प्यात नव्हते, परिणामी एकूण २३४ रस्तेप्रकरणी १८५ अभियंत्यांची चौकशी झाली. (८४ सामाईक + ८५ नवीन + १६ दुसऱ्या टप्प्यात नसलेले = १८५)

अहवालानंतर बडतर्फीची शिक्षा

दुय्यम अभियंता यमगर, दुय्यम अभियंता छत्रे, उपप्रमुख अभियंता टी. एन. कुमार, साहाय्यक अभियंता उमेश बापट, दुय्यम अभियंता डी. एन. नागरसोजे आणि एस. डी. गाडे.