मुंबई महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी शनिवारी सकाळपासूनच रस्त्यावर उतरून पाहणी करण्यास सुरुवात केली. करोनाचे रुग्ण असलेले नायर रुग्णालय आणि सर्वाधिक रुग्ण असलेल्या धारावी परिसरात त्यांनी पाहणी केली.

केवळ ऑनलाइन संवाद साधण्यापेक्षा नवनियुक्त पालिका आयुक्तांनी मैदानात उतरून पाहणी करणे, आढावा घेणे, रुग्णांशी आणि सर्वसामान्यांशी संवाद साधणे आदी मार्ग अवलंबल्यामुळे पहिल्याच दिवशी पालिका कर्मचाऱ्यांमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी चर्चा होती.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त इकबाल सिंग चहल यांची राज्य सरकारने नियुक्ती केल्यानंतर काही तासांतच त्यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी तातडीने पदभार स्वीकारला.

अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल यांनी पदभार स्वीकारला 

मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार अश्विनी भिडे आणि संजीव जयस्वाल यांनी शनिवारी स्वीकारला. अश्विनी भिडे सनदी सेवेतील १९९५ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांना २४ वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये सहसचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एम.एम.आर.डी.ए.) अतिरिक्त आयुक्तपद, तसेच शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या सचिव म्हणूनही भिडे यांनी काम पाहिले आहे. त्याचबरोबर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले.

नाराज प्रवीण परदेशी १४ दिवसांच्या रजेवर

करोनाच्या मुंबईतील वाढत्या प्रादुर्भावाबद्दल केंद्र सरकारने व्यक्त केलेल्या नापसंतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्तपदावरून तडकाफडकी दूर करण्यात आल्याने नाराज झालेले प्रवीण परदेशी १४ दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत. त्यांनी शनिवारी नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला आणि रजेचा अर्ज दाखल के ला. परदेशी यांनी सकाळी मंत्रालयात पदभार स्वीकारताच रजेचा अर्ज दाखल केला. परदेशी यांनी रजेचा अर्ज दिला असून त्यावर सोमवारी निर्णय होईल असे सामान्य प्रशानस विभागाचे(सेवा) अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवपदी बदली झालेल्या किशोरराजे निंबाळकर यांना पदभार स्वीकारू नये, असे सांगण्यात आल्याने प्रशासनातील शीतयुद्ध पुन्हा एकदा उफाळून आले आहे.

शीव रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. रमेश भारमल

शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी पालिका रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांची नियुक्ती पालिकेने केली आहे. रुग्णालयातील मृतदेह प्रकरणानंतर प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांच्याकडून कार्यभार काढून घेण्यासाठी या हालचाली केल्याची चर्चा आहे. नायर रुग्णालय हे खास करोना रुग्णालय जाहीर केल्यानंतर टिळक रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांची नायरच्या अधिष्ठातापदी नियुक्ती केली होती. त्यामुळे टिळक रुग्णालयाचा कारभार हा प्रभारी अधिष्ठाता म्हणून डॉ. प्रमोद इंगळे यांच्याकडे सोपविला होता. रुग्णांच्या व्यवस्थापनापासून मृतदेह हाताळण्यापर्यंतच्या अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे रुग्णालयात पूर्णवेळ अधिष्ठातापदाची नेमणूक करण्याचा निर्णय घेत पालिकेने ही धुरा आता डॉ. भारमल यांच्यावर सोपविली आहे. पालिका रुग्णालयांचे संचालक म्हणून जोगेश्वरीचे बाळासाहेब ठाकरे आणि जुहू येथील कूपर रुग्णालयाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.