मुंबई : करोना संसर्गाचा फटका पोलिसांनाही मोठय़ा प्रमाणात बसला असून त्यामुळे पोलीस ठाण्यांतील अनेकांवर विलगीकरणात राहण्याची पाळी आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडून पोलिसांची जातीने चौकशी सुरूच आहे. सिंग यांनी सोमवारी उत्तर मुंबईतील पोलिसांशी संवाद साधला. गेले ४५ दिवस बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची त्यांनी कौतुकाने पाठ थोपटली.
मुंबई पोलिसांनी आतापर्यंत आपली वेगळी प्रतिमा दाखवून दिली आहे. करोना हा त्याचाच भाग आहे. आपले पोलीस करोनाबाधित होऊनही तुम्ही खचून न जाता काम करीत आहात हीच माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. तुमच्यावरील कुठल्याही संकटात सर्वात आधी मी येईन, असा विश्वासही सिंग यांनी दिला. या वेळी आयुक्तांसमवेत अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत, उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी होते. बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलीस शिपायांशी आयुक्तांनी खास संवाद साधला. त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली. कामावर असतानाही काळजी घ्या, असा सल्ला दिला.
दहिसर चेक नाक्यालाही आयुक्तांनी भेट दिली. तेथील पोलिसांना मास्क, सॅनिटायझर तसेच इतर आवश्यक बाबी मिळतात का, याची चौकशी केली. काहीही तक्रारी असल्या तरी थेट माझ्याशी संवाद साधा, असे आवाहनही त्यांनी केले. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत पोलिसांच्या वसाहतीत जाऊन पोलिसांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधला आहे. जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात २६ पोलीस करोनाबाधित झाल्यानंतर ते स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाले.
पोलिसांना धीर दिला. केवळ कार्यालयात बसून न राहता पोलीस आयुक्त स्वत: वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत. विशेषत: करोनाबाधित परिसरात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांची ते आवर्जून भेट घेत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 13, 2020 2:32 am