करोना काळात बदल्या न करण्याचे शासनाचे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी डावलून आणि गृहमंत्रालयास विश्वासात न घेता दहा उपायुक्तांच्या बदल्यांचा निर्णय घेतला, अशी चर्चा पोलीस दलात सुरू आहे. शासनाच्या आदेशानुसार रविवारी पोलीस आयुक्तालयाने नवे आदेश जारी करून उपायुक्तांना पूर्वीच्या ठिकाणी पुन्हा रूजू होण्यास सांगितले.

आयुक्तांनी २ जुलैला पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक, प्रशांत कदम, परमजीत दहिया, गणेश शिंदे, डॉ. रश्मी करंदीकर, शहाजी उमाप, डॉ. मोहन दहिकर, संग्रामसिंग निशाणदार आणि नंदकु मार ठाकूर या उपायुक्तांच्या अंतर्गत बदलीचे आदेश जारी के ले. मात्र हे आदेश सिंग यांना तिसऱ्याच दिवशी मागे घ्यावे लागले. याबाबत आयुक्त सिंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रियेस नकार दिला.

बदल्यांबाबतचा शासन आदेश

राज्य शासनाने करोना काळात विविध विभागांमार्फत केलेल्या उपाययोजनांमध्ये सातत्य राखण्याच्या उद्देशाने चालू वित्तीय वर्षांत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या न करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय राज्य पोलीस मुख्यालयाने २ जूनला मुंबई आयुक्तालयासह राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालये आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठवला. पुढील आदेशांपर्यंत बदल्या करू नये, अशी स्पष्ट सूचना त्यात होती. सिंग यांनी हे आदेश डावलल्याची चर्चा आहे.

दररवर्षी सर्वसाधारण बदल्या (जीटी) होतात. त्या अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. सर्वसाधारण बदल्यांमध्ये राज्य सरकार, मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचे ठराविक अधिकाऱ्यांबाबत विशेष नियोजन, व्यूहरचना असते. आयुक्तांनी त्याआधीच बदल्या केल्याने या नियोजनाला तडे जाऊ शकतात आणि त्यामुळे गृहमंत्रालय अस्वस्थ आहे, असे पोलीस दलातील सूत्रांचे म्हणने आहे. अन्य एका तर्कानुसार आयुक्त स्तरावर बदली करतानाही गृहमंत्रालयाला विश्वासात घेतले जाते. मात्र तीन आयपीएस, सात राज्य सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना आयुक्त आणि गृहमंत्रालयात संवाद नव्हता. त्यामुळे बदल्या रद्द करण्यात आल्या, असे सांगण्यात येते.