महापालिकेने मुंबईमध्ये ‘पैसे द्या आणि वापरा’ या तत्त्वावर सुरू केलेल्या प्रसाधनगृहांमधील अंघोळ आणि शौचालयाच्या दरात अनुक्रमे तीन रुपये आणि दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र विधि समितीने दोन वर्षे हा प्रस्ताव राखून ठेवल्यामुळे आयुक्तांनी या दरवाढीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे या प्रसाधनगृहांमधील सुविधांसाठी जुनेच दर कायम राहणार आहेत.

पालिकाने ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या धोरणानुसार मुंबईत प्रसाधनगृहे उभारण्याचे काम खासगी संस्थांना दिले होते. तसेच या धोरणाअंतर्गत ‘पैसे द्या आणि वापरा’ या तत्त्वावर ही प्रसाधनगृहे चालविण्यात येत आहेत. या प्रसाधनगृहातील मुतारीचा वापर विनाशुल्क, शौचालयासाठी दोन रुपये आणि अंघोळीसाठी तीन रुपये घेण्यात येत होते.

सुरुवातीच्या तीन वर्षांसाठी हे दर निश्चित करण्यात आले होते. तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे पालिकेने या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मुतारीच्या वापरासाठी प्रतिमाणशी एक रुपया, शौचालय व अंघेळीसाठी प्रतिमाणशी प्रत्येकी पाच रुपये असा दर लागू करण्याबाबतचा प्रस्ताव विधि समितीमध्ये २०१४ मध्ये सादर करण्यात आला होता.

सार्वजनिक प्रसाधनगृहांचा वापर करणाऱ्या झोपडपट्टीवासीयांसाठी या प्रस्तावात पास योजनेचा समावेश करण्यात आला होता. या योजनेनुसार झोपडपट्टीमधील पाच सदस्यांच्या कुटुंबासाठी महिना ५० रुपये आणि पाचपेक्षा अधिक सदस्य असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी १० रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार होते.

मात्र ही दरवाढ परवडणार नाही, असे कारण देत विधि समितीने तब्बल दोन वर्षे हा प्रस्ताव राखून ठेवला होता. अखेर आयुक्तांनी या दरवाढीला स्थगिती देत सध्याच्या दरात कोणतेही बदल करू नये असे आदेश घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले. त्यामुळे आता या प्रसाधनगृहांमधील सेवांची दरवाढ टळली आहे.