गेल्या बुधवारी मध्यरात्रीनंतर देवनार कचराभूमीला लागलेल्या आगीची चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मंगळवारी दिले. चौकशीसाठी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून चौकशीचा अहवाल एक महिन्यात सादर करण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहेत.
देवनार कचराभूमीत लागलेल्या आगीमुळे केवळ गोवंडी, मानखुर्द, चेंबूरमध्येच नव्हे तर थेट दक्षिण मुंबई ते पाम बीच रोड परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालिकेवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. त्यामुळे पालिका प्रशासन अडचणीत आले आहे. आता पालिका आयुक्तांनी देवनार कचराभूमीला लागलेल्या आगीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. पालिकेचे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
कचराभूमीत आग लागली की लावण्यात आली, आग लागू नये म्हणून कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, पालिका अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे आग लागली का, कचराभूमीची सुरक्षा आदींबाबत चौकशी करण्यात येणार आहे. तसेच कचराभूमीबाबत सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास करावा, असे आदेश उपायुक्तांना देण्यात आल्याची माहिती अजय मेहता यांनी दिली. कचराभूमीस लागलेल्या आगीप्रकरणी कोणाचीही गय करू नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. कचराभूमीत आग लावल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्तांनाही याप्रकरणी चौकशी करण्याची सूचना करण्यात आल्याचे अजय मेहता यांनी सांगितले.