न्यायालयाने सुनावल्यानंतर सरकारकडून सुरक्षेची हमी

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त रस्तोरस्ती उभारलेल्या मंडपांच्या तपासणीसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या पथकांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश नसल्याची बाब उघडकीस आली आहे. गृह खात्याकडून कोणतेही आदेश न मिळाल्यामुळे या पथकासाठी मनुष्यबळ उपलब्ध करण्यास मुंबई पोलिसांकडून असमर्थता दर्शविण्यात आली. मात्र, कारवाई करणाऱ्या पथकाला पोलीस संरक्षण नाकारणे हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचे न्यायालयाने बुधवारी सुनावले. त्यानंतर सरकारने पोलीस संरक्षण पुरवण्याची हमी दिली.

गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवामध्ये रस्ते, पदपथांवर मंडप उभाण्याचे प्रमाण  वाढले आहे. यामुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत असून या प्रकारांची न्यायालयाने दोन वर्षांपूर्वीच गंभीर दखल घेतली होती. यंदा न्यायालयाने वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा ठरतील असे मंडप दृष्टीस पडल्यास पालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच मुंबईत उभारण्यात येणाऱ्या मंडपांची पाहणी करण्यासाठी तहसीलदार कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, पालिका अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची संयुक्त पथके तयार करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पथकांनी गणेशोत्सवापूर्वी सात दिवस आधी रस्ते, पदपथांवरील मंडपांची पाहणी करावी, असेही निर्देशही दिले होते. त्यानुसार मुंबईसाठी नऊ पथके स्थापन करण्यात आली. मात्र, यात तहसीलदार कार्यालय आणि पालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही पथके सध्या मुंबई शहर भागातील मंडपांची पाहणी करीत असून या पथकांना १४, १५ सप्टेंबरला अहवाल सादर करावा लागणार आहे.

पथकांमध्ये पोलिसांचा समावेश करण्यासाठी नावे कळविण्यात यावी, अशी विचारणा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मुंबई पोलिसांकडे करण्यात आली होती. मात्र, गृह खात्याकडून कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत, असे उत्तर मुंबई पोलिसांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले.

याबाबत न्यायालयाने फटकारल्यानंतर आता पथकाला पोलीस संरक्षण देणार असल्याचे सरकारने सांगितले. दरम्यान, मंडप परवानगी मिळाली नसेल, तर सार्वजनिक  मंडळांनी नियमभंग करण्यापेक्षा खासगी जागेमध्ये गणेशपूजन करावे, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर यांनी केले.

चार मंडपांवर कारवाई

रस्ता किंवा पदपथ अडविणाऱ्या, तसेच परवानगी मिळाल्यानंतर अवाढव्य मंडप उभारणाऱ्या अंधेरी पश्चिम आणि आसपासच्या परिसरातील चार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर पालिकेने कारवाई केली. शास्त्रीनगर टॅक्सी स्टॅण्ड गणेशोत्सव मंडळ, विघ्नहर्ता मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ आणि न्यू यूथ क्लब गणेशोत्सव मंडळ मंडळांच्या मंडपांवर पालिकेने कारवाई केली. न्यायालयाच्या आदेशानुसारच कारवाई करण्यात येत असल्याचे साहाय्यक आयुक्त (के-पश्चिम विभाग) प्रशांत गायकवाड यांनी सांगितले.

न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ते, पदपथांवरील मंडप पाहणीसाठी पथकांची स्थापना करताना पोलीस दलाकडे संबंधित अधिकाऱ्यांची नावे सादर करण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र, गृह खात्याकडून कोणतेही आदेश नसल्याचे पोलीस दलाकडून कळविण्यात आले.

– शिवाजी जोंधळे, जिल्हाधिकारी, मुंबई शहर