महानगरपालिकेतील सर्व गटनेत्यांनी तुर्कस्तानची भ्रमंती केल्यानंतर आता इतर समितीच्या सदस्यांना देशांतर्गत दौऱ्यांची परवानगी देऊन खूश ठेवण्याचा प्रयत्न झाला. आरोग्य समिती, स्थापत्य समिती आणि महिला व बालकल्याण समितीतील सदस्यांना उत्तराखंड, कर्नाटक, हैदराबादच्या अभ्यास दौऱ्यावर जाण्यासाठी बुधवारी गटनेत्यांच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, मात्र दरवर्षी अभ्यास दौऱ्यांवर जाणाऱ्या नगरसेवकांनी त्यानंतर शहरातील योजनांमध्ये भरीव योगदान दिल्याचे उदाहरण पालिका इतिहासात नाही.
विविध शहरांमधील नागरी व्यवस्थांचा अभ्यास करण्यासाठी दौरे काढण्याचे तीन प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आले. नुकतीच तुर्कस्तानची हवा खाऊन आलेल्या गटनेत्यांनी त्याला कोणताही विलंब न लावता मान्यता दिली. आरोग्य समितीच्या अध्यक्ष गीता गवळी यांनी उत्तराखंड राज्यात दौरा करण्याबाबत परवानगी मागितली होती, मात्र कोणत्याही विशिष्ट शहराचे नाव निश्चित केले नव्हते. हे नाव निश्चित करण्याची सूचना देऊन दौऱ्याला परवानगी दिली गेली. महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष पूजा महाडेश्वर यांनी कर्नाटक किंवा तामिळनाडू असे दोन पर्याय गटनेत्यांना सुचवण्यात आले तेव्हा कोणत्याही एका राज्यात जाऊन येण्याची अनुमतीही उदारहस्ते देण्यात आली. शहर स्थापत्य समितीचे अध्यक्ष अनिल सिंग यांच्याकडून आलेल्या हैदराबादच्या दौऱ्याच्या प्रस्तावालाही मिनिटभरात मान्यता मिळाली. त्यामुळे गटनेत्यानंतर आता विविध समिती सदस्यही पालिकेच्या निधीतून देशभरात दौरे करण्यास तयार झाले आहेत. या अभ्यास दौऱ्यानंतर संबंधित नगरसेवकांना इतर शहरांतील व्यवस्थापनाची माहिती व्हावी व त्यानुसार शहरातील योजनांमध्ये सुधारणा व्हावी हा हेतू असतो. मात्र अभ्यासापेक्षा स्थळ पाहणीत अधिक रस दाखवणाऱ्या नगरसेवकांकडून दौऱ्यावरून परतल्यानंतर कोणतीही भरीव योजना मांडली गेल्याचे उदाहरण नाही.