24 September 2020

News Flash

सीटी स्कॅनचे दर कमी करण्यासाठी समिती!

खासगी लॅबमध्ये किंवा मोठय़ा रुग्णालयात त्यासाठी अडीच हजार ते पाच हजार रुपये आकारले जातात.

(संग्रहित छायाचित्र)

संदीप आचार्य

यापूर्वी आरोग्य विभागाने वेळोवेळी समिती नेमून उपचारांच्या सुविधांपासून करोनासाठीच्या वेगवेगळ्या चाचण्यांचे दर कमी केले आहेत. आता करोना रुग्णांसाठी सीटी स्कॅनचे दर कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने समिती नियुक्त केली आहे.

राज्यात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. यातील बहुतेक करोना रुग्णांना न्युमोनियाचा त्रास होत असल्याने त्यांना छातीचा सीटी स्कॅन काढण्यास डॉक्टर सांगतात. यासाठी येणारा खर्च मोठा असतो.

खासगी लॅबमध्ये किंवा मोठय़ा रुग्णालयात त्यासाठी अडीच हजार ते पाच हजार रुपये आकारले जातात. खरे तर एक्स-रेमध्ये सारे स्पष्ट होत असूनही डॉक्टरांकडून आर्थिक कारणांसाठी सीटी स्कॅन काढायला सांगितले जाते असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. काही प्रकरणांत सीटी स्कॅन आवश्यक असून करोनाच्या कठीण काळाचा विचार करून सीटी स्कॅन चाचणीचे दर कमी होणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय क्षेत्राचेही म्हणणे आहे. अनेक लोकप्रतिनिधींनी सीटी स्कॅनसाठी अवाजवी रक्कम आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी केल्या असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याची दखल घेत सीटी स्कॅन तपासणीचे दर कमी करण्याबाबत समिती नेमण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी समिती स्थापन केली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शीव रुग्णालयाच्या रेडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. अनघा जोशी, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे व जे. जे. रुग्णालय अधिष्ठाता यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या आठवडय़ात ही समिती सीटी स्कॅनसाठीचे सुधारित दर जाहीर करतील, असे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 12:00 am

Web Title: committee to reduce the rate of ct scans abn 97
Next Stories
1 अभिनेते वैभव मांगले यांच्याशी उद्या गप्पा
2 ‘कोंबडी, अंडय़ांपासून करोनाचा धोका नाही ’
3 बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला मान्यता
Just Now!
X