कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये महिला अत्याचार तक्रार निवारण समित्या कार्यरत कराव्यात, अशा सूचना आदेश राज्याचे महिला व बालविकासमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकू र यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिल्या.

अमरावती विभागातील वन अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या पाश्र्वाभूमीवर  मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन महिला अत्याचार तक्रार निवारण समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.  महिलांची कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक प्रतिबंध अधिनियम २०१३ अंतर्गत शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समित्या तात्काळ कार्यरत कराव्यात. चुकीचे काम करणाऱ्या कोणाही व्यक्तीस पाठीशी घालण्याचा प्रयत्न होता कामा नये, तसेच कोणीही पीडित महिला न्यायापासून वंचित राहू नये, असे निर्देश त्यांनी  दिले. या वेळी प्रधान सचिव आय. ए. कुंदन उपस्थित होत्या.