सचिन तेंडुलकर जिमखाना, कांदिवली
mn66नाममात्र दरात सरकारी भूखंड मिळवून क्रीडा सुविधा देण्याच्या नावाखाली थेट क्लबसंस्कृतीलाच मोकळी वाट देण्यात आली आहे. एकप्रकारे खासगी कंत्राटदाराला हे क्लब आंदण दिले आहेत. सदस्यत्व असल्याशिवाय प्रवेश नसल्यामुळे हे क्लब मूठभर धनिकांचीच मक्तेदारी झाले आहेत. त्यामुळे सामान्य माणूस यापासून दूर फेकला गेला आहे. अशा काही क्लबचा हा खेळ..
पश्चिम उपनगरातील युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी भूखंडाची मागणी करणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) कांदिवलीत मोक्याच्या ठिकाणी पालिकेच्या अखत्यारीतील खेळाचे मैदान म्हणून आरक्षित असलेला १० एकर भूखंड नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात आला. परंतु युवा खेळाडूंच्या कथित विकासाला तिलांजली देत ‘एमसीए’ने उच्चभ्रूंच्या सोयीसाठी आणखी एक ऐषोरामी क्लब मात्र स्थापन केला. ‘मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जिमखाना’ असे नामकरण करून एमसीएने खेळाच्या मैदानाची मागणी करणाऱ्या विरोधकांची तोंडेही गप्प करून टाकली आहेत.
कांदिवली पश्चिमेतील महावीर नगरातील या आलिशान क्लबचे उद्घाटन करताना असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांनी क्रिकेटपटूंना हे मैदान विनाशुल्क उपलब्ध असल्याचा उल्लेख केला. परंतु स्थानिक क्रिकेटपटूंना येथे फिरकूही दिले जात नाही. एमसीएचे खासगी सुरक्षारक्षक स्थानिकांना हुसकावून लावत आहेत. इतकेच नव्हे तर अटी व शर्तीची तपासणी करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या उद्यान विभाग अधिकाऱ्यांनाही सुरक्षा रक्षक आत जाऊ देत नाहीत. सदस्य असला तरच या आलिशान क्लबमध्ये प्रवेश शक्य आहे. अन्यथा बाऊन्सर्स तुच्छतेने पाहतात. सदस्य होण्यासाठी आवश्यक असलेले शुल्क सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. नाव सचिन तेंडुलकर यांचे आणि व्यवस्था मात्र क्रिकेटशी काहीही संबंध नसलेल्या मूठभर धनिकांची, अशीच काहीशी या क्लबची गत झाली आहे. पालिका, पोलीस तसेच मंत्रालयातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना सेवा सदस्यत्व बहाल करून ‘एमसीए’ने अटी व शर्तींचा भंग झाला तरी कारवाई होऊ नये, याची तजवीज केली आहे.
मोक्याच्या ठिकाणी असलेला हा भूखंड पालिकेने स्थानिकांसाठी मैदान म्हणून आरक्षित ठेवला होता. परंतु मुंबई क्रिकेट असोसिएशनची त्यावर नजर गेली आणि स्थानिकांच्या हातातून तो भूखंड निसटला. पालिकेबरोबर झालेल्या करारात हे मैदान स्थानिकांनाही उपलब्ध करून देण्याचे एक कलम आहे. परंतु या मैदानाला घातलेल्या कुंपणाने हे हिरवेगार मैदान त्यांच्यापासून हिरावले आहे. मैदान ज्या ठिकाणी संपते, तिथेच खरा राजेशाही प्रवास सुरू होतो. श्रीमंतांसाठी एक ऐषारामी क्लबसदृश वास्तू डोळे दिपवून टाकते.
या संदर्भात माहिती अधिकारात मिळविलेली कागदपत्रे पाहता, मुंबई क्रिकेट असोसिएशनला पश्चिम उपनगरातील युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी खुल्या भूखंडाची आवश्यकता होती. ‘एमसीए’चे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांनी तसे पत्र पालिका आयुक्तांना लिहिले. अर्थात राज्यात त्यावेळी सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारचे म्हणणे पालिकेने मान्य केले आणि काळजीवाहू पद्धतीने हा भूखंड ‘एमसीए’कडे २००३ मध्ये सोपविला. २००४ मध्ये एमसीएने क्रिकेट अकादमी विकसित करण्यासाठी परवानगी मागितली. परंतु इतक्या वर्षांत युवा खेळाडूंसाठी अकादमी उभी राहिली नाही. मात्र मे. शिर्के बिल्डर्सबरोबर व्यापारी करार करून डोळे दिपविणारा आलिशान क्लब उभा राहिला. त्यामुळे सभोवतालच्या इमारतींचे बाजारातील चौरस फुटाचे दर मात्र वाढले. स्थानिक नगरसेवक असलेल्या शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावेळी पवारांच्या नावाने जोरदार आवाज उठविला. परंतु सदस्यत्व मिळाल्यानंतर सारे काही शांत झाले.
* भूखंड : १० एकर
मालकी : महापालिका.
* सदस्य शुल्क : १० लाख
* सुविधा : तीन बार, एक शाकाहारी हॉटेल, एक शाकाहारी-मांसाहारी हॉटेल, एक कॉन्टिनेन्टल फूडचे हॉटेल आणि एक कॉफी शॉप. पंचतारांकित जलतरण तलाव, सोना बाथ, जॅकूझी आणि मसाज. बोलिंग, व्हिडीओ गेम्स तसेच अत्याधुनिक चिल्ड्रन्स पार्क.
* खेळ : बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्क्वॉश, कॅरम, बिलियर्ड्स, स्नूकर्स यांचे आलिशान कोर्ट्स तसेच जॉगिंग ट्रॅक. कार्ड गेमसाठीही स्वतंत्र विभाग.
* निवास : १४ आलिशान खोल्या आणि दोन सूट्स.लग्नासाठी तसेच विविध कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या क्षमतेची सभागृहे. मैदानही उपलब्ध.

सर्व सुविधा पुरविण्यासाठी इतका पैसा खर्च करण्यात आला आहे. मग सुविधा फुकट कशा देणार? स्थानिक रहिवाशांसाठी जॉगिंग ट्रॅक ठेवण्यात आला आहे. याशिवाय सीझन चेंडूच्या सामन्यांसाठी मैदान दिले जाते. राज्य पातळीवरील क्रिकेटपटूंनाही सरावासाठी मैदान दिले जाते. १४ व १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंनाही हे मैदान उपलब्ध आहे.
– पी. व्ही. शेट्टी, मानद सचिव, मुंबई क्रिकेट असोसिएशन.

अटी :  क्रिकेट अकादमी/ क्रीडा संकुल म्हणून विकसित करणे, सुरुवातीला १० वर्षांसाठी भाडेपट्टा आणि नंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण (३० वर्षांपर्यंत),
क्लब हाऊस बांधण्यास परवानगी. स्थानिकांच्या वापरासाठी भूखंड मोकळा ठेवणे.