मुंबई क्रिकेट असोसिएशनला कांदिवली येथील महावीर नगरमध्ये देण्यात आलेल्या भूखंडावर उभारणात आलेल्या क्लबकडून सर्वसामान्य नागरिकांस प्रवेश देण्यास मज्जाव देत असल्यामुळे सुधार समितीने या क्लबला भेट देऊन घेतलेल्या आक्षेपाचा खुलासा घेतला असता तो असोसिएशनकडून अद्याप करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे.
उपनगरांमध्ये नवोदित क्रिकेटवटुंना मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने मुंबई महापालिकेने महावीर नगर येथील एक मोठा भूखंड मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिला आहे. या भूखंडावर मुंबई क्रिकेट असोसिएशनने आलिशान क्लब उभारला असून त्यांचे सभासदत्व घेण्यासाठी लाखो रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. पालिकेने दिलेल्या भूखंडावर सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. मात्र तेथे सर्वसामान्य नागरिकांना मज्जाव केला जात आहे. तसेच तेथे बिअर बार चालविण्यासही नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. पालिकेच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी नगरसेवकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. आक्षेपांचा खुलासा मुंबई क्रिकेट असोसिएशनने अद्याप केलेला नाही. त्यामुळे आता पालिका असोसिएशनवर कोणती कारवाई करणार, असा प्रश्न काँग्रसचे नगरसेवक मोहसिन हैदर आणि नगरसेविका अजंता यादव यांनी सुधार समितीच्या गुरुवारच्या बैठकीत उपस्थित केला.
या असोसिएशनला दिलेल्या भूखंडाचा प्रस्ताव पालिका सभागृहात पुन्हा चर्चेला आणण्यात आला आहे. सुधार समिती सदस्यांनी भेटी दरम्यान घेतलेल्या आक्षेपांवरील खुलास करण्याचे आदेश असोसिएशनला पालिका उपायुक्त आणि उद्यान विभागाच्या अधीक्षकांनी दिले होते. परंतु असोसिएशनने अद्यापही स्पष्टीकरण पाठविलेले नाही. त्यामुळे लवकरच असोसिएशनवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका उपायुक्त चंद्रशेखर चोरे यांनी यांनी दिली.